येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - यशवंतराव चव्हाण हे एक जाणते आणि बहुआयामी नेतृत्व होते. शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, संस्कृती इ. क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम यशवंतरावांनी केले आहे. यशवंतराव अजातशत्रू राजकारणी होते, असे प्रतिपादन सासवड येथिल वाघिरे महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख आणि यशवंतराव चव्हाण यांचे चरित्रकार डॉ. नानासाहेब पवार यांनी केले.
स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या ११२ व्या जयंती निमित्त यशवंतराव चव्हाण व्यासपीठ, अहिल्यानगर,व न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव अॅड. विश्वास आठरे, खजिनदार अॅड. दीपलक्ष्मी म्हसे, सहसचिव जयंत वाघ, प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, अॅड. सुभाष भोर, प्राचार्य. डॉ. बी. एच. झावरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यशवंतराव समजून घेत असताना स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडातील त्यांची वैचारिक जडण-घडण समजून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आई विठाईने त्यांच्या अंगी बाणविलेल्या करारी बाण्याविषयीचा प्रसंग देखील त्यांनी आपल्या मनोगतात उधृत केला.
यशवंतरावांचे सहकार, उद्योग, शिक्षण, इ. क्षेत्रांबाबतचे धोरण, बाबा कल्याणी, शंतनू किर्लोस्कर, इ. उद्योजकांना केलेली मदत, त्यांचे भाषाप्रभुत्व, साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोष मंडळ आदिंची केलेली निर्मिती, इ. विविध पैलूंवर त्यांनी आपल्या मनोगतात प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्य सुरुवातीला प्राचार्य. डॉ. बाळासाहेब सागडे यांनी स्वागत केले. तसेच व्यासपीठाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव निमसे यांनी प्रास्ताविक करून व्यासपीठाच्या स्थापनेमागील हेतू विषद केला. डॉ. सर्जेराव निमसे यांनी सांगितले की बहुजन समाजातील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणेसाठी व्यासपीठाच्या माध्यमातुन काम करण्याचे स्व: वाघ यांचे स्वप्न होते.
अॅड. आठरे यांनी मनोगतात यशवंतरावांच्या शिवनेरी किल्ल्यावरील भाषणाचा दाखला दिला. त्याचबरोबर स्व. खासदार चंद्रभान आठरे यांना यशवंतरावांचा खासदारकीच्या तिकिटासाठी आलेला फोन व त्यानंतरच्या सर्व घडामोडींच्या स्मृती जागविल्या. त्याचबरोबर बहुजनांच्या शिक्षणासाठी यशवंतरावांनी घेतलेले निर्णय, यशवंतराव व प्र. के. अत्रे यांच्यातील घडलेला प्रसंग, त्यांनी सांगितले.
आयुक्त यशवंत डांगे यांनी यशवंतरावांनी घेतलेला ई.बी.सी सवलतीचा निर्णय, उजनी, कोयना धरणांची केलेली पायाभरणी, देशात सर्वप्रथम राबविलेली पंचायत राज व्यवस्था, रोजगार हमी कायदा, कसेल त्याची जमिनचा कायदा आदी निर्णयांची माहिती दिली.
कराड येथील साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून केलेल्या भाषणाचा संदर्भ देखील त्यांनी दिला. त्याबरोबरच विदयार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कसा अभ्यास करावा याची माहिती दिली. अध्यक्षीय मनोगत रामचंद्र दरे यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी व्यासपीठातर्फे प्रकाशित केलेल्या ‘युगप्रर्वतक यशवंतराव’ या ग्रंथाच्या निर्मिती मागील इतिहास कथन केला. यशवंतरावांना विविध लेखकांनी व वक्त्यांनी दिलेल्या विशेषणांचे वाचन केले. शेवटी आभार प्रदर्शन प्रा. दशरथ खोसे यांनी केले.