येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
फुलेंच्या लेकी शिकाव्यात म्हणून फुलेंनी शेणाचे गोळे खाल्ले. त्याच फुलेंच्या लेकी आज टिकली, बिंदी, सात दिवसाचे सात रंग, या घोळात अडकून स्वतःची मानसिक, शारिरीक, बौध्दिक प्रगती थांबवत आहेत. तुम्ही म्हणाल आजच हे जिजीला का आठवलं.?
याच कारण.. ‘इंडियन नॅशनल सायन्स अॅडमी’च्या अहवालानुसार देशाच्या महत्वाच्या विज्ञान संस्था आणि विद्यापीठांमध्ये संशोधन करणाऱ्या, शिकवणाऱ्या आणि तांत्रिक आघाडीवर काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण पूर्वी ४० टक्के, म्हणजे समसमान होते. ते आता फक्त १५ टक्के झालेय. यातही प्रशासकीय जागा, संस्थाप्रमुख, धोरणं ठरविण्याचे अधिकार असलेल्या जागांवर महिलांची संख्या आणखीन कमी आहे.
या क्षेत्रात करिअर करताना बराच वेळ लागू शकतो. भारतीय परंपरेत लग्नाच्या तथाकथित वयात मुलीचं लग्न होणं हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. लग्न झालेल्या स्त्रीवर कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात. मुलांचे संगोपन इ. काही पुरुष संशोधकांना आपल्या टीममध्ये महिला संशोधक अडचणींच्या वाटतात.
खरतरं तिची क्षमता भारतीय पुरुषसत्ताक पध्दती लक्षात घेत नाहीच. एकावेळी तिची अनेक काम करण्याचा उरक, निर्णय क्षमता, काटकसर, या गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीतच. हे आपण रोजच्या जगण्यात जर डोळे उघडून पाहिलं तर आपल्याला दिसेल ना.
एकीकडे भाजी, आमटी उकळत असते. तिसऱ्या बर्नरवर कुकरमध्ये भात होत असतो. एकीकडे चपाती करता करता ती जेवणाच्या टेबलावर बसलेल्या छोट्याचा अभ्यास घेत असते. मध्येच नवरोबाला काही सापडत नसतं. त्याच्या हाकांना प्रतिसाद देत.. हिचे चपातीला गोल आकार द्यायचे अभियान सुरु असते.
मध्यंतरी मी टॉपर मुली करिअर सोडून काय करतात, हा लेख लिहिला होता. तो तुम्ही वाचला आहातच.. हा समाजाचा विकास नव्हे, ही एकरेषीय वाढ झाली फक्त. शिक्षणाने सुबत्ता आली, पण माणसं शहाणी कुठं झाली त्याचं हे नेमकं उदाहरण.
तिचं अवकाश तिला द्यायला हवं, असं कुठल्याच घरातील पुरुषाला द्यावसं वाटत नाही का.? हो असतीलही तिला संधी देणारे. पण त्यांचा अविर्भाव तिच्यावर उपकार केल्याचा असतो. स्त्रीयांसाठी संधी निर्माण केल्या पाहिजेत. जेणेकरुन मुळातच स्वभावात चिकाटी, परिश्रम करण्याची तयारी असलेल्या महिला संशोधक बनून देशाच्या विकासात नक्कीच हातभार लावतील.
पण शिकलेली माणसं सुशिक्षित होतातच, असं नाही. साक्षर होत असतील. फुलेंच्या आधीही माणसं साक्षर होतीच आणि नंतरही होत आहेत. साक्षरतेमधून सुशिक्षित होण्याचा प्रवास फार थोड्यांना साध्य होतो. काळाच्या पुढे विचार करणारी माणसाना आपण म्हणूनच ‘द्रष्टे’ म्हणतो.
महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीमाई हे असंच एक दुर्मिळ दांम्पत्य. पत्नीला संधी देऊन तिच्यातून एक असामान्य व्यक्तिमत्व घडवणं केवळ आणि केवळ महात्मा फुलेंना साध्य झालं. घराघरात सावित्री संधीची वाट पहातेय, पण तिला घडविणारे जोतिबा मात्र असायला हवेत. निर्माण व्हायला हवेत.
‘हैप्पी टू ब्लीड’ म्हणत स्वतःच्या स्त्रीत्व आणि हक्कांविषयी जागरूक असलेल्या माता भगिनींना सुशिक्षित होण्याची सुबुद्धी लाभो हीच इच्छा. शिक्षणाची कास धरून, सुशिक्षित होऊन, कर्मकांडाच्या नादी न लागता संपत्ती आणि बलशाली पिढी निर्माण करण्याची सुबुद्धी सगळ्याच समाजाला मिळो, हीच इच्छा.
‘सगळ्याच समाजाला’ असा शब्द जाणीवपूर्वक वापरायचं कारण म्हणजे फुले ‘आमचे’, आंबेडकर ‘त्यांचे’ आणि शिवाजी महाराज ‘अजून कुणाचे तरी’, अशी संकुचित मनोवृत्ती घेऊन समाज म्हणून आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही.
असा मर्यादित विचार जर छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतीराव फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केलेला नसेल, तर असला कद्रूपणा आता आपण तरी का करावा.? आजकालची पिढी परत त्या कर्मकांड, बुवाबाजी या दुष्ट चक्रात अडकताना दिसतेय. काळाची चक्र उलटी फिरताहेत. ही काळाची चक्रे उलटी फिरवायला का त्यांनी आपल्याला शहाणे केलंय..?
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)