दि. ८ मार्च १९०८ ला न्युर्याकमध्ये वस्त्रोद्योगातील स्त्री कामगारांनी पहिला ऐतिहासिक निदर्शने केली. कामाचे ठराविक तास, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी ही निदर्शने होती. या दोन मागण्यांबरोबर मतदानाच्या हक्काचीही मागणी करण्यात आली.
1910 साली झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्ती क्लारा झेटकीन हिने कोपनहेगन इथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 1908 च्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करावा म्हणून ठराव पास करण्यात आला.
समान अधिकारासाठी सुरु झालेल्या संघर्षाच्या लढाईतून महिला दिनाची कल्पना पुढे आली. 8 मार्च 1917 रशियातील महिलांनी अन्न आणि कपडे अधिकारासाठी संप पुकारला होता. झारशाहीच्या अस्तानंतर रशियातील महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
1975 ला युनोने विश्वातील विविध देशातील कष्टकरी महिलांनी केलेल्या संघर्षाची दखल घेऊन 8मार्च हा दिवस जागतिक महिला दिन घोषित करण्यात आला. पण समान अधिकारासाठी केलेल्या संघर्षाचा गाभा हरवत चालला आहे. समतेसाठी स्त्रीचा लढा अजूनही चालू आहेच.
महिला दिन साजरा करताना आपल्या देशात कमालीची विसंगती आणि विरोधाभास आढळतो. विरोधाभास यासाठी की स्वयंघोषित संस्कृतीरक्षक अजूनही स्त्री प्रवेशाने मंदिर बाटते, तिने पाश्चात्य कपडे घातले की संस्कृती बिघडते... असा टाहो फोडताना दिसतात.
अजूनही देशाच्या काही ठिकाणी तिने शृंगार करावा की नाही... स्वयंपाक कसा करावा (आमच्याच घरची पध्दत पुढे गेली पाहिजे असा आग्रह, अंह 'सक्ती' असते) कितीतरी घरात सुशिक्षित स्त्रीयाही रुम सर्व्हिस देताना दिसतात...
ही गोष्ट घरातील सदस्याच्या सवयीची होते. मग तिचं वय वाढतं, जबाबदारी वाढल्यामुळे तिने कांही काम केली नाहीत, तर घरातले लोक तिच्यावर चिडतात. घरात हे दुय्यमत्व जपणारे लोक दुसऱ्यां, बाहेरच्या स्त्रीयांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत असतात.. ह्यापेक्षा विरोधाभास कुठला.?
स्त्रीला स्वतःला असा स्वतःचे स्वप्नं पहायचा अधिकार नाही. स्वप्नं पुरुषांनी पहावी. आपल्या कर्तृत्वाने ती पूर्ण करावी. याला 'पुरुषार्थ' म्हणतात. असा 'स्त्रीयार्थ' का बरं नसावा.?
तिने कितीही मोठ्या पदावर काम करावं, पण घरी दमून आल्यावर स्वयंपाकघरात सांग्रसंगीत स्वयंपाक करायचा. कारण तिला दिलंय ना नोकरी करायचं स्वातंत्र्य दिलय ना.. मग 'शाब्बास सुनबाईचा' रोल निभवायला हवा, असं सासरच्यांनाच काय माहेरच्यांनाही वाटत असतं बरं मंडळी.!
'सुलू' नावाच्या सिनेमात विद्या बालनने एका गृहिणीचा अभिनय केला होता. साधीशी गृहिणी पण आरजे बनते. पण तिच्या या नोकरीमुळे तिचं सारं कुंटूब विरोधात जाते. तेव्हा ती खंबीरपणे संवादाने प्रश्न सोडवून ती पुन्हा नोकरीवर रुजू होते.
पण हे वास्तव जीवनात घडते का.? तिला बोलू दिलं जात का ? हाही मुद्दा अभ्यास करण्यासारखा आहेच. आता करिअर करता करता घर, मुले सांभाळणे मुली करत आहेत. पण या दगदगीमुळे मुलींच्या तब्येतीवर परिणाम होतो. तिच्या स्वभावावर होतो.
लग्नाच्या आधी स्वप्नं पाहणारी, एक भावनाशील मुलगी, तिचं रुपांतर सहन करुन करुन एका कर्कश बाईमध्ये होतं. याचा दोष पूर्णतः तिलाच दिला जातो. म्हणून मुलांनीही आता घरकाम, बालसंगोपन, यात पत्नीला मदत करण्यात कमी पडता नये. किंवा फुकाचा पुरुषी अंहकार पतिपत्नीच्या मध्ये येता कामा नये.
परिवर्तन ही काळाची गरज आहे. ती आपण स्वीकारायला हवी. मुलग्याला किंवा मुलीला उच्च शिक्षण द्यायला हवेच. पण त्याबरोबरच घरकाम, जरुरी स्वयंपाक आलाच पाहिजे, हे पालकांनी लक्षात ठेवायला हवं.
मुलगा रडायला लागला की घरातील मोठे म्हणतात, 'ए रडतोस काय मुलींसारखा'.. इथे आपण दुःख व्यक्त करण्याची नैसर्गिक भावना दाबून टाकण्याचे चुकीचे शिक्षण देत असतो. मग रडायचं ते मुलींनी आणि रडवायचं ते मुलींनाच, अशी विकृत भावना असलेल्या पुरुषाचा जन्म होत असतो.
स्त्रीचं शारारिक कमकुवतपण हे छळण्यासाठी आहे, हे आपण मुलांना शिकवतो आणि मुलींना तुम्ही सहनच करायला पाहिजे, अशी शिकवण देत असतो. पुरुषसत्ताक पध्दतीने वाढीला लावलेली स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे. ही भावना पुरुषांच्या मनात ठाम बसलेली असते.
लैंगिक सुख हे स्त्रीकडून ओरबाडून घेणं, हा जणू स्वतःचा हक्क आहे, असंच वाटून काही विकृत पुरुष तिच्यावर जबरदस्ती करतात. बलात्कारी पुरुषांच्या मानसिकतेचा अभ्यास केला असता त्या लहानपणापासूनच झालेली वाढ, त्यांच्या सभोवतालची परिस्थिती कारणीभूत असते.
महिला दिनाचा जन्मच मुळी स्त्रीयांनी त्यांचे अधिकार मागण्यासाठी केला होता हेच पुरुषसत्ताक पध्दती विसरते आहे. अपेक्षांचे नेहमीच ओझे होते स्विकारणं हे सुखाच असतं, पण तिनं ते प्रेमानं आपल्या मर्जीने करायला हवं.
स्त्रीच्या शरिरापलीकडे जाऊन तिला माणूस म्हणून पाहिलं जाण्याची गरज आहे. केवळ सत्ता आहे, बळ आहे, म्हणून स्त्रीला गृहीत धरणं बंद व्हायला हवं. बलात्काराच्या केसेसमध्ये जलद न्यायप्रक्रिया व्हायला हवी. निकाल, कडक शिक्षा व्हायला हव्यात. तरच समाजातील अशा विकृत घटकांवर जरब बसेल.
कारण वर्षानुवर्षे समजावून सांगून समाजाला जर कळत नसेल तर अशा जरब देणाऱ्या शिक्षेने तरी अशा विकृतांना भिती वाटेल. प्रसिध्द फ्रेंच लेखिका सिममॉन द बोव्हा म्हणते, बाई म्हणून कुणीही जन्म घेत नसते, तर तिला बाई बनविले जाते.
मी तर यापुढ जाऊन म्हणेन, 'बाईला शरीराच्या परिघात समाज जाणिवपूर्वक अडकवून ठेवतो'. यासाठी तिच्या 'माणूस' असण्याच्या जाणिवा प्रखर होणं महत्वाचे आहे.!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, गुलामाला आपण गुलाम आहोत हे समजणं, म्हणजेच त्याच्या माणूसपणाच्या जाणिवेची सुरवात. स्त्री-पुरुष हे एकमेकींना पुरक आहेत. पण पुरुषसत्ताक पध्दतीने त्यांना स्पर्धक बनवले आहे.
पुरुष श्रेष्ठ आणि स्त्री कनिष्ठ.. पुरुष हा जेता आणि स्त्री ही जीत हे शिक्कामोर्तब केलं. अर्थातच महिला दिन थाटात साजरा होईल. मग पुन्हाः महिलांवर अत्याचार, बलात्कार होत राहातील. महिलांची टिंगल करणारे जोक्स फॉरवर्ड फॉरवर्डचा खेळ लोक चवीने खेळतील.
अर्थात सारंच कांही बिघडलंय, असं नाही. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आलीय. स्त्रीया बोलू लागल्यात. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरुप बदलत गेले आहे.
खेड्यापाड्यातील स्त्रीचा सुर्योदय व्हायचा बाकी आहे. अर्थातच लढाई अजूनही बाकी आहे. स्त्री आपली स्पर्धक नाही, पुरक आहे, हे पुरुषसत्ताक पध्दतीच्या जेव्हा लक्षात येईल, तेव्हाचं घराघरात नंदनवन होईल. सर्व सख्यांना शुभास्ते पंथान संतु.
- स्वप्नजा घाटगे
(संपादक सखीसंपदा, कोल्हापूर)