सामाजिक शहीद - सावित्रीबाई फुले,
साऊआईस,
साष्टांग दंडवत !
दि. १० मार्च १८९७ ला तु गेलीस, अगदी काम करता करता गेलीस.
पुण्या मुंबईत प्लेगने कहर मांडला होता. तुझा डॉक्टर मुलगा सैन्यात नोकरीला होता. तु त्याला तातडीने बोलावून घेतलेस. हडपसर जवळच्या ससाणे मळ्यात तंबू टाकून दवाखाना सुरू करायला लावलास.
यशवंत तुला प्लेगची भयानकता समजावून सांगत होता. तु त्याला म्हणालीस, 'आज ज्योतीराव असते तर ते निष्क्रिय राहिले असते का.? आपल्याला जमेल तेवढे आपण करायचं.!' आई, कसं केलंस गं.?
त्या काळात ना ॲंब्युलन्स होती ना स्ट्रेचर.. आजाऱ्याला स्पर्श केला तरी मरण ओढवणार, हे माहित असूनही तू घरोघरी फिरून आजारी असलेली लहान मुले, मुली, महिला यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात होतीस..
स्वतः त्यांची सेवासुश्रुषा करत होतीस. पुण्यातील पुढारी मात्र या रोगाच्या भितीने इकडे तिकडे पांगले होते. तु मात्र कित्येकांना बरं केलंस. मुंढव्याच्या दलित वस्तीतल्या गायकवाडांच्या मुलाला प्लेग झाल्याचे कळल्यावर तू तिकडे धावलीस.
पांडुरंग अकरा वर्षांचा होता. पोरं तापाने फणफणलेले, काखेत गोळा आलेला.. एका चादरीत पोराला गुंडाळलंस आणि ६७ वर्षांची तू.. सात.. आठ किलोमीटर चालत गेलीस, मुंढवा ते हडपसर, ससाणे मळा, व्हाया मगरपट्टा, पल्ला तसा मोठाच, पण तू डगमगणारी थोडीच..
मोगल मर्दिनी ताराबाई राणीसाहेबांना आदर्श मानणारी तू, तशीच कणखर होतीस. त्याच्यावर उपचार केलेस बरं केलंस, पांडुरंग जगला मात्र तुला प्लेगने जखडले.. सलग ५० वर्ष हा देह समाजासाठी, मुलं, मुली, महिला यांच्यासाठी वाहिलेला तुझा देह थकला होता.
१० मार्च १८९७ रोजी तू आम्हाला सोडून गेलीस. साऊआई, तुझ्यासारखी माणसं मरत नाहीत, ती जिवंत असतात, आमच्यासारख्या लेकींच्या मनामनात. आई, तु दिलेला वसा आम्ही उतरणार नाही, मातणार नाही, जीवापाड जपणार आहे.
तुला विनम्र अभिवादन.! बस्स अशीच सोबत रहा. तु देशासाठी शहीद झाली होतीस, हे इतिहास कधीच पुसून टाकू शकणार नाही, हे मात्र नक्की.
तुझीच लेक,
स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)