अहिल्यानगर - येथील सुप्रसिद्ध कवयित्री, मुक्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांचा महिलादिनी राज्यस्तरीय नारी सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.
गेल्या अठरा वर्षांपासून सामाजिक तथा साहित्यिक उपक्रम राबविणाऱ्या उपदेशक आयोजित राज्यस्तरीय महिला मेळाव्यात आल्हाट यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉन बॉस्को येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपदेशकचे संस्थापक विक्रम गायकवाड यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आल्हाट यांना प्रदान करण्यात आला.
या वर्षाची जागतिक महिला दिनाची थीम असलेली 'एक्सलरेट ॲक्शन' अर्थात 'फक्त चर्चा न होता वेगाने कृती करा.!' या विषयावर सरोज आल्हाट यांनी मार्गदर्शन केले.
त्या म्हणाल्या, महिलांच्या विविध प्रश्नांवर केवळ चर्चा होण्याऐवजी त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कृती होणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये सुप्त अवस्थेत मोठी शक्ती असते, ती शक्ती आपल्या प्रश्नांसाठी लढताना स्वतःचे मानसिक स्वास्थ्य ही जपण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक स्त्रीने आपल्या कलेची जोपासना, शैक्षणिक, कौशल्य व आर्थिक विकास करावा. महिलांनी स्वयंपूर्ण होवून अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन केले.
समाजात महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत असल्याचा निषेध व्यक्त करुन महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिलांनाच पुढाकार घेऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे त्या म्हणाल्या.
महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आल्हाट यांनी स्वरचित मदर इंडिया ही कविता सादर केली. या कवितेला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. महिला दिनी मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.