तुकोबाराया, तुकाराम बीज... तुकोबारायांचे वैकुंठ गमन, विमान यांचे फोटो पाहून मन विषण्ण झाले आहे.
जे का रंजले गांजले,
त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा..!
रंजल्या गांजल्या लोकांना आपले म्हणून देव तिथेच आहे, असे सांगणारे तुकोबा.. बहुजन समाजाला दिशा दाखवणारे, तुकोबाराय शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हणतात,
आम्हा घरी धन!
शब्दांची रत्ने
शब्दांचीच शस्त्रे,यत्ने करु!
शब्दे वाटू धन जनलोका. !
जनप्रबोधन करताना ज्ञान, शब्दांचे महत्व सांगणारे तुकोबा. अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता याविरुद्ध अभंग लिहिणारे तुकोबा. समाजातील प्रस्थापित जेव्हा त्यांना संस्कृत येत नाही, म्हणून हेटाळणी करण्यास सुरुवात केली, तेव्हा तुकोबा म्हणतात,
'वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा,
येराना वाहवा भार माथी,
तुका तरी सहज बोले वाणी,
त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी...!'
हा तुकोबांचा अभिमान आहे.. नम्रपणे ते ज्ञान आणि वेद कुणाची मक्तेदारी नाही असं स्पष्ट करतात. समाजातील लोकांना चांगल्या मार्गाने पैसा मिळवला पाहिजे. सोबत त्याचा विनियोगही योग्य पध्दतीने केला असे सांगताना,
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे,
उदास विचारे वेच करी..!
धनाचा विनियोग मर्यादित आणि विचारपूर्वक केला पाहिजे हे सांगताना तुकोबाराय बघा ४०० वर्षांपूर्वी तंबाखूचे विडीचे व्यसन करणाऱ्यालाही जागे करत आहेत.
ओढुनि तंबाखू काढीला जे धूर,
बुडेल ते घर तेणे पापे..!
असं तळमळीने सांगत आहेत. भाकडकथा सांगून आपले पोट भरणारे लोक तुकोबारायांना आवडत नाहीत..
भिक्षापात्र अवलंबणे
जळो ते जिणे लाजीरवाणे..!
असे त्यांना ते परखडपणे विचारत आहेत. बहुजनांच्या मनामनात कर्मकांड, अनिष्ट प्रथा, भविष्य याविरुद्ध आवाज काढताना ते अत्यंत परखड भाष्य करतात...!
मेळवुनि नरनारी,
शकुन सांगति नानापुरी !!
तुका म्हणे ऐसे मैंद
तयापाशी नाही गोविंद
सांगो जाणती शकुन!
भूत भविष्य वर्तमान
तयांचा आम्हासी कंटाळा !
त्याचे तोंड न पाहावे..!
स्त्री पुरुषांना एकत्र करून भविष्य सांगणाऱ्या लोकांचे तोंडही पाहू नये.. असं तुकोबाराय म्हणतात...!
मायबापे अवघी काशी
तेणे न भजावे तिर्थाशी
तुका म्हणे मायबापे
अवघी देवाचीच रुपे.!
काशी विश्वनाथ पेक्षा आईवडिलांची सेवा करावी हे खरे पुण्य. जिवंतपणी भुकेल्याला अन्न घालावं, मेल्यावर पिंडदान करण्यात काहीच अर्थ नाही. आईवडिलांची सेवा करा.
भुकेलेल्या अन्नदान करा, आई वडिलांबरोबर, पती -पत्नी, बहिण -भाऊ, शेजारी या सर्वाचा आदर करा. तुकोबारायांचे विचार लोककल्याणकारी आहेत.
जाऊनिया तिर्था काय तुवा केले
धर्म प्रक्षाळीले वरी वरी
तीर्थी धोंडा पाणी..
देव रोकडा सज्जनी !
नाही निर्मळ जीवन
काय करील साबण.!
वरकरणी स्वच्छता करून काय उपयोग ?
अंतःकरणाची स्वच्छता महत्त्वाची.. सज्जन लोक हे कुठल्याही तिर्थक्षेत्रापेक्षा आणि साबणापेक्षा श्रेष्ठच असतात.
तुकोबाराय श्रीमंत होते, बुध्दीमान होते. त्यांनी लोकांना कर्जमुक्त केले. आयुष्यभर सामाजिक विषमतेवर परखड भाष्य आणि अंधश्रद्धांना विरोध केला. आपण सारे एकच आहोत,
वर्णाभिमाने
कोण झाले पावन,
ऐसे द्या सांगून
मजलागी..!
वर्णव्यवस्था पाळून खरंच कोणी पावन झाले आहे.? असं विचारुन
नवसे कन्या पुत्र होती
मग का करणे लागे पती.?
समाज व्यवस्थेला झंझाडून ठेवणारा हा प्रश्न विचारत रहातात.. ज्ञान मिळवणे यासाठी अभ्यासाचे महत्त्व तुकोबारायांना चांगलेच माहित आहे. म्हणून नव्या पिढीला ते म्हणतात,
असाध्य ते साध्य
करिता सायास
कारण अभ्यास
तुका म्हणे..!
असे हे आपले जगद्गुरु तुकोबाराय त्यांनी "या जन्माची मला भिती नाही, मोक्षाला लाथा घाला.." असे स्पष्ट म्हणले आहे. तर ते तुकोबाराय वैकुंठाला गेले असा दुष्ट प्रचार का झाला असावा.? कारण त्यांनी वैकुंठ नाकारला होता. कारण ते सांगतात,
येथेच मिळतो दहीभात
वैकुंठी त्याची नाही मात
पृथ्वीवर कष्टाने दहीभात तरी मिळेल. पण वैकुंठात जे कल्पवृक्ष, चिंतामणी इ .इ. सांगितले जाते, ते धादांत खोटे आहे. अशी निर्भिड व्यक्ती, वैकुंठाला नाकारल्यालेल्या तुकोबारायांना विमान न्यायला आले, ही अफवा त्यावेळच्या प्रस्थापितांनी का उठवली असेल.?
सत्य आणि परखड विचार हे पचले नाहीत, की मग माणसं संपवली जातात. पण सत्य हजारो वर्षांपासून हेच सांगत आहे, की माणसं मारता येतात पण विचार मरत नाहीत. भित्री, आत्मविश्वास नसलेले लोक असे विचार संपतील, म्हणून माणसं मारत आहेत आणि अपयशी होत आहेत.
पण बोले तैसा चाले,
त्याची वंदावी पाऊले..
- स्वप्नजा घाटगे (संपादक-सखीसंपदा, कोल्हापूर)