कोल्हार भगवतीपूर (ता. राहाता, जि. अहिल्यानगर) येथे १९९४ साली जन्मलेल्या, साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण याला इयत्ता चौथीतील इतिहासाच्या पुस्तकातील धड्यांतून प्रेरणा मिळाली.
इयत्ता दहावीची परीक्षा झाली आणि याच दरम्यान खासगी दूरचित्रवाणीवरील नितीन देसाई यांच्या 'राजा शिवछत्रपती' या मालिकेने त्याला इतिहासाची गोडी लागली. त्याने मनोमन ठरवले की, खरोखरच महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धांमध्येही त्याने सहभाग घेतला. इयत्ता अकरावीत प्रवेश केल्यानंतर, त्याने शिवचरित्राचा अभ्यास करणे सुरू केले. त्यानंतर प्राचीन नाणी मिळवणे, विविध गड-किल्ल्यांवर भ्रमंती करणे, गड-किल्ल्यांच्या छायाचित्रांचा संग्रह करणे, छत्रपती शिवरायांवर माहिती गोळा करणे, अशा गोष्टींचा त्याला छंद लागला.
महाविद्यालयात शिकतानाही, साईप्रसाद वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग घेत असे. शिवकालीन इतिहास नव्या पिढीला कदाचित तपशिलात माहिती नसेल; पण आजही किमान दोन ते तीन पिढ्या अशा आहेत, ज्यांना हा इतिहास अगदी मुखोद्गत आहे.
याच प्रेरणेतून साईप्रसादने पाठ्यपुस्तकांपासून ते हाती पडेल, त्या साहित्यातून इतिहासाचा धांडोळा घेण्यास सुरुवात केली अन् उत्तरोत्तर यात त्यांची रुची आणखी वाढतच गेली. वाचनासोबतच भ्रमंतीही सुरू होती. जर एखाद्या गडावर तो भटकंतीला गेला असेल, तर तेथे जे लोक गड पाहण्यासाठी येतात, त्यांना त्या गडाची संपूर्ण माहिती साईप्रसाद आवर्जून सांगत असतो.
विशेष म्हणजे, यासाठी तो कोणताही मोबदला घेत नाही. महाराष्ट्रातील शिवस्पर्शाने पावन झालेल्या, शिवतीर्थ गडांची लोकांना माहिती मिळावी, म्हणून त्याने विविध वृत्तपत्रांतून लिखाण करण्यास सुरुवात केली. त्याने विविध दैनिके, साप्ताहिके, मासिके तसेच अनेक नियतकालिकांमधून सुद्धा प्रासंगिक लेखन केले.
त्याचबरोबर विविध वार्षिक अंक आणि दिवाळी अंकात इतिहासासह विविध विषयांवर लेखन प्रसिद्ध असून, ७०० हून अधिक लेख विविध दैनिकांत विविध विषयांवर आजवर प्रसिद्ध झाले आहेत. 'प्रवरा कम्युनिटी' रेडिओवर मुलाखतीदेखील झाल्या आहेत.
साईप्रसादला जुनी नाणी व विदेशी नाणी गोळा करणे, हा छंद आहे. त्याच्याकडे नाणी संग्रहदेखील आहे व सोबत छत्रपती शिवरायांवरील बर्याच वेगवेगळ्या पुस्तकांचा ठेवा देखील त्याच्यापाशी संग्रहित आहे. त्याच्याकडे विविध गड-किल्ल्यांचे फोटो, शिव सरदारांचीदेखील माहिती आहे. इयत्ता बारावीनंतर साईप्रसादने इतिहासात करिअर करण्याचे ठरवले.
इतिहास विषयात 'बीए' केल्यानंतर, 'एमए'देखील इतिहास विषयात त्याने पूर्ण केले. पुढे इतिहास संशोधनात आवड असल्याने 'एम.फिल' व 'एमसीजे'देखील त्याने पूर्ण केले. साईप्रसाद याने शिवचरित्राचा चांगल्या रितीने अभ्यास केला. तसेच 'एम.ए'मध्ये शिकत असताना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा तो 'बहीशाल वक्ता' बनला.
या माध्यमातून आजपर्यंत अनेक ठिकाणी शिवचरित्रावर उत्तमरितीने त्याची व्याख्याने झाली आहेत. सध्या तो पद्मश्री विखे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. भविष्यात साईप्रसादला इतिहासावर 'पीएचडी' करायची आहे. साईप्रसादच्या या शिवप्रेमाची वाखाणणी महाराष्ट्रभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांसह अनेक मान्यवरांनी केली.
- २०१८ मध्ये जिल्हास्तरीय 'छत्रपती पुरस्कार'
- २०१९ साली पत्रकार संघाचा 'राज्यस्तरीय पुरस्कार'
- २०२० साली 'अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ पुरस्कार'
- 'स्व. पै. किसनराव डोंगरे युवा गौरव पुरस्कार'
- २०२१ साली 'ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पुरस्कार'
- २०२३ साली 'ज्ञानतंत्र संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार'
- २०२४ साली कोकण ग्रामविकास मंडळाचा राज्यस्तरीय साहित्य सेवा पुरस्कार
- अशा विविध पुरस्कारांनी साईप्रसादला सन्मानित करण्यात आलेले आहे.
गडकिल्ले संवर्धन व जनजागृती मोहिमेत सहभाग घेण्याबरोबरच साईप्रसाद विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये हिरिरीने सहभाग घेत असतो. 'इतिहास' या विषयात राज्य स्तरावर त्याचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहे.
विद्यापीठस्तरीय 'साहस' या शिबिरातही त्याने सहभाग नोंदवला आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज', 'छत्रपती संभाजी महाराज', 'राजमाता जिजाऊ', 'स्वामी विवेकानंद', 'इतिहासाची पाने चाळूया', 'दुर्ग संवर्धन' अशा विविध विषयांवर साईप्रसाद व्याख्यानांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास अगदी गावखेड्यापर्यंत पोहोचवत आहे.
नवीन पिढीला संदेश देताना साईप्रसाद सांगतात की, 'शिवशाहीचा इतिहास लाभलेला छत्रपती शिवरायांचा सहवास लाभलेल्या गड-किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे व तरूण पिढी व मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा; तसेच आजचा समाज घडविण्यासाठी शिवचरित्र मार्गदर्शक आणि तितकेच प्रेरणादायी आहे.
यातून एक चांगला समाज निर्माण होईल व पालकांनीदेखील शिक्षणाबरोबरच मुलांना ऐतिहासिक किल्ल्यांची आवड निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी मुलांना गड-किल्ले दाखवावेत, जेणेकरून गड-किल्ले हे मातीचे नुसते ढिगारे नसून, शिवस्पर्शाने पावन झालेले शिवतीर्थ आहेत, हे त्यांना समजेल. या शिवतीर्थांची (किल्ल्यांची) आवड मुलांमध्ये पालकांनी निर्माण करावी.'
त्याचबरोबर गड-किल्ले संवर्धन व जतन होणे गरजेचे असल्याचे साईप्रसादला वाटते. अशा या हरहुन्नरी शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक, युवा व्याख्यात्याला त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा..!
लेखक : दीपक शेलार (मुंबई)