मी एक रोपटे आहे. कधीकाळी कोमेजलेले, अंधारात हरवलेले पण डॉ. गिरीश कुलकर्णी सर, म्हणजेच आमचे बाबा, यांनी मला मातीमध्ये रुजवले, प्रेमाने वाढवले, आणि समाजपरिवर्तनाच्या वाऱ्यांनी मला बळ दिले.
आज मी बालविवाह मुक्ती मिशन म्हणून उभा आहे. आज मी अन्यायाला प्रतिकार करणारी शक्ती आहे, आज मी शिक्षण आणि स्वातंत्र्यासाठी झगडणारी जिद्द आहे. पण मी एकटा नाही... माझ्यासारखी हजारो रोपटी स्नेहालयच्या मार्गदर्शनाने समाजात परिवर्तन घडवण्यासाठी उभी आहेत.
- ही रोपटी कोण आहेत.?
- महिला आणि मुली : ज्यांनी अत्याचार सहन केले, पण आता सशक्त होत आहेत.
- बालविवाह पीडित मुली : ज्यांचे आयुष्य बंदिस्त होते, पण आता त्यांनी नवीन दिशा घेतली आहे.
- अनाथ आणि निराधार : ज्यांना आधार नाही, पण स्नेहालयच्या सावलीत सुरक्षित आहेत.
- मनोरुग्ण आणि शोषित : ज्यांना समाजाने दूर केले, पण आता त्यांचे पुनर्वसन होत आहे.
- अपंग आणि वंचित लोक – जे आता आत्मनिर्भर होण्याच्या वाटेवर आहेत.
- कौटुंबिक अत्याचारग्रस्त – जे पुन्हा सन्मानाने जगण्यासाठी सज्ज आहेत.
- या साऱ्यांना आयुष्याची नवी दिशा देणारे एकच नाव – गिरीश कुलकर्णी.
गिरीश कुलकर्णी: परिवर्तनाचा दीपस्तंभ. समाजात महिलांवर अन्याय, अत्याचार, शोषण आणि भेदभाव पाहून अनेकजण केवळ दु:ख व्यक्त करतात, तर काहीजण परिवर्तनासाठी उभे राहतात. असेच परिवर्तन घडवणारे, हजारो महिलांचे आणि मुलींचे आयुष्य उजळवणारे गिरीश कुलकर्णी म्हणजेच आशेचा किरण.
1989 साली, केवळ 19व्या वर्षी त्यांनी स्नेहालयची स्थापना केली. त्या वेळी स्त्रियांवरील अत्याचार, वेश्याव्यवसायात अडकलेल्या महिलांची दुर्दशा आणि लैंगिक शोषणाची समस्या मोठ्या प्रमाणावर होती. समाजाने या महिलांना तिरस्काराने हिणवले, पण गिरीश सरांनी त्यांना मदतीचा हात दिला.
ते स्वतः रेड लाइट भागात जाऊन महिलांना व मुलींना समजावत, त्यांचे पुनर्वसन करत आणि त्यांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत. अनेक प्रसंगी धमक्या, विरोध आणि संघर्ष सहन करत, त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार केला.
स्त्रियांसाठी गिरीश कुलकर्णी यांचे कार्य : १. महिलांचे पुनर्वसन आणि संरक्षण. हजारो महिलांना त्यांनी वेश्याव्यवसायातून बाहेर काढले. एच आय व्ही सह जगणाऱ्या महिलांना मायेचा आधार दिला. त्यांना शिक्षण, आरोग्यसेवा आणि आर्थिक मदतीसह स्वतंत्र जीवन जगण्यास मदत केली.
लैंगिक शोषण आणि तस्करीविरोधी लढा दिला. पीडित मुलींसाठी निवास, शिक्षण आणि पुनर्वसन सुविधा,
समाजात तस्करीविरोधी मोहिमा राबवून महिलांना वाचवले. बालविवाह निर्मूलन आणि शिक्षणासाठी लढा देत
‘उडान प्रकल्प’ मार्फत बालविवाह रोखून हजारो मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. शाळांमध्ये ‘चाईल्ड फ्रेंडली’ उपक्रम राबवून, मुलींना संरक्षण आणि प्रेरणा दिली.
महिलांसाठी स्वावलंबन आणि करिअर संधी : अनेक महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. कौशल्यविकास प्रशिक्षण, लघुउद्योग, आणि आर्थिक मदतीचे कार्यक्रम राबवले. समाजातील महिलांविषयीची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करत महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जनजागृती अभियान हाती घेतले. स्नेहालयच्या माध्यमातून विविध कायदेशीर आणि सामाजिक लढे उभारले.
ही रोपटी मोठी होत आहेत. ही रोपटी आता वटवृक्ष बनत आहेत, स्वतः सावली देत आहेत, आणि अंधारलेल्या वाटांना उजेडाने भरत आहेत. स्नेहालयच्या मार्गदर्शनाने महिला सशक्तीकरण, बालविवाह निर्मूलन, पुनर्वसन, शिक्षण, आरोग्य, आणि न्याय मिळवून देण्याचे काम अखंड सुरू आहे.
एका युगपुरुषाचा प्रभाव : गिरीश कुलकर्णी यांचे कार्य म्हणजे केवळ समाजसेवा नाही, तर समाजातील मूलभूत परिवर्तनाचा प्रवास आहे. त्यांनी वंचित महिलांना सन्मानाचे जीवन दिले, मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध केल्या आणि संपूर्ण व्यवस्था बदलण्यासाठी पुढाकार घेतला.
आज, त्यांचे नाव घेतल्यावर समाजात अंधारात हरवलेल्या लाखो महिलांचे उजळलेले चेहरे डोळ्यासमोर येतात. त्यांचा हा प्रवास अजूनही सुरू आहे आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. महिला दिनानिमित्त गिरीश कुलकर्णी यांना सलाम.!
महिला दिन हा फक्त महिला सशक्तीकरणाचा उत्सव नाही, तर अशा पुरुषांचा सन्मान करण्याचा क्षण आहे, जे महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष करतात, त्यांचे आयुष्य बदलण्यासाठी झटतात आणि समाजाला अधिक समतावादी बनवतात. गिरीश कुलकर्णी यांनी संवेदनशीलता, कृतीशीलता आणि निःस्वार्थ सेवेच्या माध्यमातून हजारो महिलांचे जीवन सुंदर केले आहे.
'जेथे स्त्रियांना सन्मान आहे, तेथेच समाजाचा विकास होतो!'
- प्रविण कदम,
उडान प्रकल्प व्यवस्थापक, स्नेहालय