येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची अभ्यासपूर्ण भटकंती, बारव संवर्धन व ऐतिहासिक वारसा जतन करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनतर्फे दरवर्षी किल्ले धर्मवीरगड ते किल्ले रायगड या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्षे होते.
यंदाचा पालखी सोहळा युवकांच्या आणि गावोगावच्या शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त उपस्थितीत उत्साहात पार पडला. छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील किल्ले धर्मवीरगड येथे ठेवण्यात आले होते. त्यानंतर शंभूराजे परत कधीच रायगडावर गेले नाहीत. या किल्ल्यात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले.
इथेच इतिहासाला मोठी कलाटणी मिळाली. त्यामुळे शंभूराजे आणि शिवरायांची भेट व्हावी या भावनेतून शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवदुर्ग परिवार हा पालखी सोहळा आयोजित करतो. यावर्षी दि. ८ फेब्रुवारी रोजी किल्ले धर्मवीरगड येथून सुरू झालेली ही रथयात्रा दोन दिवसांत २५० कि. मी. प्रवास करून किल्ले रायगडवर पोहचली.
अनेक शिवशंभू भक्तांच्या उपस्थितीत ९ फेब्रुवारी रोजी पहाटे पाचाड चितदरवाजा येथुन निघालेली पालखी महादरवाजा, नगारखान्यातून राज सदरेवर पोहचली, आणि तेथे पितापुत्रांची छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांची यांची भेट घडून आली. त्या क्षणाला तमाम शिवशंभू प्रेमींचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद अनुभवयास मिळाला.
यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन सर्वांना गडाची माहिती देण्यात आली. शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष डॉ चंद्रशेखर कळमकर व प्रा. भरत खोमणे यांच्या नियोजनात या रथयात्रेत ७० जणांनी सहभाग घेतला.
या रथयात्रे दरम्यान गावोगावच्या शिवप्रेमींनी पालखीचे जोरदार स्वागत केले. कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी या उपक्रमाची दखल घेऊन फोनवरून शिवदुर्गच्या शिलेदारांना शुभेच्छा दिल्या. श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी देखील शिवदुर्गचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनने महाराष्ट्रात आजवर ६९ किल्ल्यांवर प्लास्टीमुक्त किल्ले अभियान राबविले आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला दरवर्षी रायगड किल्ल्यावर स्वछता अभियान राबविले जाते. रायगड स्वछता मोहिमेचे हे सलग ८ वे वर्ष होते.
'प्लास्टिक ही आजकाल जागतिक समस्या झाली आहे. भविष्यात शिवरायांचे गडकोट प्लॅटिकच्या विळख्यात पहायला लागू नये. यासाठी प्लास्टिकमुक्त रायगड', हा शिवदुर्गचा संकल्प असल्याची माहिती शिवदुर्गचे संस्थापक अध्यक्ष राजेश इंगळे यांनी दिली.