येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील संज्ञापन अभ्यास विभागाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिबिंब या चित्रपट, लघुपट व माहितीपट महोत्सवाची सुरुवात आजपासून होत आहे. हा चित्रपट महोत्सव चित्र महर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मृती दिनानिमित्त १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येतो.
यावर्षीच्या चित्रपट महोत्सवाची थीम ‘रहस्य’ ही असून देशविदेशातील विविध भाषेतील चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. याबरोबरच भारतभरातून स्पर्धेसाठी आलेले लघुपट व माहितीपट पाहता येणार आहेत. याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्र स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून, तेही पाहण्यासाठी सर्वांसाठी चार दिवस खुले राहणार आहे.
हा चित्रपट महोत्सव सर्वांसाठी खुला व मोफत असून रसिकांनी त्याचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी केले आहे. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या हस्ते प्रतिबिंब चित्रपट महोत्सव व फोटोग्राफी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
सकाळी १० वाजता अंदाधुंद या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. दुपारी द ग्रीन माईल व संध्याकाळी शटर आयलँड हे चित्रपट दाखविण्यात येतील. दुसऱ्या दिवशी (१६ फेब्रुवारी) सकाळी प्रसिद्ध दिग्दर्शक दिवंगत श्याम बेनेगल यांच्या स्मरणार्थ अंकुर हा चित्रपट दाखविण्यात येईल. दुपारी १ वाजल्यापासून स्पर्धेतील माहितीपट व संध्याकाळी ६ वाजल्यापासून स्पर्धेतील लघुपट दाखविण्यात येतील.
तिसऱ्या दिवशी (१७ फेब्रुवारी) दिवसभर स्पर्धेतील विद्यार्थी व खुल्या गटातील लघुपटांचे प्रदर्शन होईल. चौथ्या दिवशी (१८ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजल्यापासून उर्वरित लघुपट स्पर्धा पार पडेल. दुपारी २ वाजल्यापासून उपस्थितांना परीक्षकांशी संवाद साधता येईल.
या चारही दिवस हा महोत्सव पाहण्यासाठी दररोज सकाळी ९ ते रात्री ९ या दरम्यान खुला असेल, शहरातील जाणकार रसिकांनी या महोत्सवास अवश्य भेट द्यावी असे आवाहन संज्ञापन अभ्यास विभागातर्फे करण्यात आले आहे.