येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - येथील संगीत गायक, गुरू व अभ्यासक पवन श्रीकांत नाईक जागतिक संगीत महोत्सवात हजेरी लावणार आहेत. फज्र आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सव, तेहरान (ईराण) येथे आयोजित करण्यात आला आहे. दिनांक ११ ते १७ फेब्रुवारी २०२५ या ७ दिवसीय महोत्सवात त्यांना १३ व १४ फेब्रुवारी अशा दोन मैफलींसाठी विशेष निमंत्रित कलाकार म्हणून बोलावले आहे.
संपूर्ण जगातील ५० ते ५५ देशांचा यात सहभाग असतो. पवन नाईक मैफलीत अरबी, फारसी, उर्दू, हिंदी व पंजाबी भाषेतील सूफी तत्त्वज्ञानाची गीते सादर करणार आहेत. अवा ए जमीन (Sound Of the Earth) या विशेष (इंडो - पर्शियन) कलावृंदासह हा नाईक यांच चौथा दौरा आहे. भारतातून उदय देशपांडे (तबला) व नेपाळयेथून अमानो मनीष (चतुरंगीणी) साथसंगत करतील.
ईराण मधील अवा ए जमीनचे सर्वेसर्वा वाहिद आईर्यान (गायक, संगीतकार व तंबूर वादक) हे आयोजन विशेष पुढाकार घेतात. सोबत मोज्तबा कलंतरी (सेतार व डफ) तसेच अली शेहबाजी, नासरीन अब्दुलवंद, सरीना अमरोल्लाही, लैला येकानी जा़दे, जाहरा गोजिरी, बेसिक शश्मिनी गीयाजवंद, मोहम्मदरेजा़ अलिजा़दे व अलीजा़दे रुस्तम हे सर्व पर्शियन कलाकार तंबूर साथ व सहगायन साथ देणार आहेत.
नाईक यांना मैफलीसाठी संगीत गुरू शुभलक्ष्मी गुणे, सुरेश साळवी, मधुसूदन बोपर्डीकर, रेवन्नाथ भनगडे, सतीश आचार्य, कुमुदिनी बोपर्डीकर, शुभांगी मांडे, वीणा कुलकर्णी, रघुनाथ केसकर, डॉ. शुभांगी बहुलीकर व डॉ. विकास कशाळकर तसेच सूफी व उर्दूसाठी ख़लिल मुजफ्फर, बशीर अहमद, डॉ. मुहम्मद आज़म, सूफी फैयाज़ अहमद, काकूजी व मौलाना असरार यांचे मार्गदर्शन लाभले.
पवन श्रीकांत नाईक यांना कला, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध संस्थाच्या वतीने या दाैऱ्यासाठी शुभकामना मिळत आहेत.