अहिल्यानगर - पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करुन, हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्याविरूध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात व पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्या पथकाला हद्दपार इसमांना चेक करुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
त्यानुसार पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदे, मनोहर गोसावी, हृदय घोडके, संदीप दरंदले, रोहित येमुल, प्रमोद जाधव, रमीजराजा आत्तार, बाळासाहेब नागरगोजे, सागर ससाणे, अरूण मोरे व महादेव भांड यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी जिल्ह्यातील हद्दपार केलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा अहिल्यानगर शहरामध्ये व शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत असताना ३ सराईत गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करून बेकायदेशीररीत्या वास्तव्य करीत असताना मिळून आले.
त्यांचेविरूध्द शिर्डी व तोफखाना पोलीस स्टेशनला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून विशाल मायकल मोकळ (वय 27, रा. आंबेडकरनगर, राहाता) व सागर भाऊसाहेब गायकवाड (रा. नवीन बाजारतळ, बिरोबा रोड, शिर्डी) यांना ताब्यात घेतले आहे.
तसेच तोफखाना हद्दीतून सलमान मेहबुब खान (वय 30, रा. कोठला, घासगल्ली, अहिल्यानगर) याला ताब्यात घेऊन तोफखाना पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे व प्रशांत खैरे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.