अहिल्यानगर - राहुरी फॅक्टरी परिसरात गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई दि. ८ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
गुरुप्रसाद बाबासाहेब वाळुंज (वय-२४, रा. गजानन वसाहत, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) असे राहुरी पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.
राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली होती, की राहुरी फॅक्टरी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एक युवक देसी बनावटीचे गावठी पिस्तूल बेकादेशीर विना परवाना स्वतः जवळ बाळगत आहे.
अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ पथक तयार करून राहुरी फॅक्टरी परिसरात खात्री करून कारवाई करणे बाबत सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस पथकाने बातमीच्या ठिकाणी सापळा लावून त्या युवकाला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात ३० हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी पिस्तूल व ३ हजार रुपये किमतीचे ३ जिवंत राऊंड मिळून आले. या युवकाविरुद्ध राहुरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आलेली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपुर अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, श्रीरामपूर उपविभागाचे डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे, यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
पोलिस पथकामध्ये सहायक फौजदार गीते, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके, सुरज गायकवाड, राहुल यादव, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, सचिन ताजने, नदीम शेख, अमोल भांड, भाऊसाहेब शिरसाट यांचा समावेश होता.