हल्ली बऱ्याच वेळा बऱ्याच प्रसंगी महिला फेटे घालून सणांचा 'इव्हेंट' साजरा करताना दिसतात. हे अनावश्यक फॕड कुठून आलं, हे समजत नाही. मला ते अजिबात आवडत नाही. एकीकडे समतेची लढाई लढायची अन् मग अशा पुरुषी प्रतिकांची आवरणं घालायची. खरतर याची काहीच आवश्यकता नाहीच.
'स्त्री'ला तिची शक्ती दाखवण्यासाठी फेट्यांसारख्या पुरुषी प्रतिकांची गरज का भासावी? पदर किंवा ओढणी खोचून पुरुषांना अशक्य असणारी असंख्य कामे लीलया पूर्ण करणाऱ्या स्त्रीला अशा प्रतिकात का अडकवले जाते?
हीच गोष्ट हातातल्या स्टीलच्या कड्याची. बांगड्या भरलेल्या हातांनी केले नाही असे एक तरी काम आहे का या पृथ्वीतलावर? मग त्या बांगड्यांचा त्याग करून कडे कशाला हवे? फेकायचीच तर सगळी प्रतिके फेकायला हवीत. बांगड्या फेकून कडे घालणे, फेटे घालणे हे पुन्हा पुरुषी गुलामगिरीचेच लक्षण आहे.
तुम्हाला काय वाटतं ? अर्थात हे माझं मत आहे ! तुमचं काही वेगळही असू शकतं. मी फेटा नाही घातला तरी माझं कर्तृत्व कमी होणारच नाही. मला माझ्या डोईवरील पदराचा अभिमान आहे. जिजाऊ, सावित्रीआई, येसुबाई, ताराऊ, अहिल्याबाई या साऱ्याजणी डोईवरचा पदर घेऊन अनिष्टांशी लढल्या.
तो वारसा आम्हालाही चालवायला हवा. हं आता तुम्ही डोईवर पदर नाही घेतला तरी चालेल, पण कर्मकांड, अनिष्ट प्रथा यांना तिलांजली द्यायला हवी. कारण पुरुषांच्या अनुकरणाने स्त्रीचे सबलीकरण होणार नाही. काय मंडळी पटतंय का.?
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)