आजच्या पेपरमध्ये मी वाचलं की नृसिंहवाडीला स्नानासाठी गेलेल्या दोन स्त्रियांना बुडताना इतरांनी वाचवलं. हे स्नान महत्त्वाचे आहे का.?
आजच्या काळातली आकडेवारी पाहिली तर मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय स्त्रिया धार्मिक कर्मकांडांमध्ये पहिल्यापेक्षा जास्त अडकलेल्या दिसत आहेत. जी काही कमी होती ती या मोबाईल आणि इंटरनेटने पूर्ण केलेली आहे.
सतत येणारे ते कर्मकांडांचे व्हिडिओ वेगवेगळ्या बाबांचे तोटके हे पाहून असं वाटतं की आपण परत मागे चाललो आहोत. बरं या नव्या नव्या माता जे दिसत आहेत, त्या कुंभमेळ्यात हिंदू धर्माचे ज्ञान देताना दिसत आहेत. आणि दुसरीकडे त्यांचे वेस्टर्न कपड्यातले नृत्य करणारे व्हिडिओ पण फिरतात.
पुजेअर्चेमध्ये सर्वात जास्त अपमान स्त्रीचा होत आहे. विधवा, जिची मासिक पाळी आलेली आहे, जिला मुलं नाहीये, जी परित्यक्ता आहे, अशा स्त्रियांना पूजेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जाते.
आपल्या समाज व्यवस्थेत बहुदा सर्व जातीय महिलांवर प्रथा परंपरांचा सर्वाधिक ओझं धर्माच्या नावाखाली लादले गेले आहे. प्रथा रुढी परंपरा म्हणजेच धर्म, अशी समजूत स्वतःला वरचे समजणारे आणि खालचे समजणारे, बहुतांशी सर्व वर्गामध्ये आहे.
या चालीरीतीमध्ये मधून स्त्रीचा अपमान होत आहे याची स्त्रियांनाही जरा सुद्धा शंका येऊ नये ? का धर्माचे आज्ञा म्हणून तिने ते सोसत राहायचं आहे.?
तुम्ही डोळे उघडून वावरत असला तर तुम्हाला सगळं स्वच्छ दिसतं, असं नसतंच. त्यासाठी मनाचे काळजाचे दरवाजे उघडे ठेवावे लागतात. एकमेकींबद्दल प्रेमाचा आपुलकीचा 'भगिनी भाव' सतत जागृत ठेवावा लागतो.
पती निधनाचे दुःख ताजं असताना, मनाचा धीर सुटलेला असताना, हातातील हिरव्या बांगड्या फुटत असेल.. कपाळीचं कुंकू पुसलं जात असेल, गळ्यातील मंगळसूत्र ओढून काढले जात असेल, तो धक्का मरणाच्या धक्क्या इतकाच मरणप्राय असतो., याची जाणीव डोक्यात मेंदू आणि हृदयात प्रेम असणारे व्यक्तींनाच कळेल.
संवेदना मनामध्ये जागली जायला पाहिजे असं मला सतत वाटत राहतं. स्त्री ही आपल्यावर होणारा या पद्धतीचा अन्याय धर्माचे आज्ञा म्हणून सहन करत राहते. साध्या कुठल्याही राजकीय कार्यक्रमात आलेल्या तथाकथित थोर नेत्यांना औक्षण करायलाही पाच सवाष्णीच लागतात.
स्टेजवर उभा राहून आम्ही कितीही पुरोगामी पनाच्या गप्पा मारल्या तरी आम्ही अडाणी आहोत हेच खरं. सौभाग्यवती शुभ आणि विधवा अशोक, हा विचारच मुळी स्त्रीचा अपमान करणारा आहे.
नवरा गेल्यानंतर आपली मुलं खंबीरपणे वाढवणारी कुटुंबाचे संरक्षण करणारी परिस्थितीशी दोन हात करणारी स्त्री. पण तिला कुंकू लावताना हात आखडला घेतला जातो. महिलांची पण इच्छा हीच असते की मला अहेवपणे मरण यावं. दोन वेगवेगळे जन्मलेले जीव, कोणी आधी जाणार, कुणी नंतर जाणार हे ठरलेलं असताना पण स्त्रिया या भावनांच्या बळी पडत असतात.
हिरवा रंग खरंतर सृजनाचा रंग, निसर्गाचा रंग, तो एखाद्या विधवा स्त्रीने वापरायचा नाही हे अतिशय अमानुष वाटत राहतं. डोई फुल माळायचे नाही, ती ओटी भरायची नाही आणि हे बायका करत असतात. त्यामुळे हे मला अतिशय अघोरी आणि दुष्टपणाचं वाटत राहतं.
हल्ली पूजा, कर्मकांड यांचं सेलिब्रेशन होताना दिसून येत आहे. वेगवेगळ्या साड्या मेकअप करून वडाला पूजा घालणाऱ्या फेऱ्या घालणाऱ्या मुली, उपवास करणाऱ्या मुली, ह्या शिक्षित असतात, पण त्या सुशिक्षित आहेत का.?
समाज बांधणीमध्ये स्त्रीची महत्त्वाची भूमिका आहे. समाजाच्या निर्माणाची भूमिका करताना आपण समाजाला कुठे घेऊन चाललो आहोत, याकडे दुर्लक्ष करून शकणार नाही. या अंधश्रद्धा कर्मकांडांमध्ये पुरुषही सामील आहेत.
'राजकारणी', तेही कर्मकांड अंधविश्वास पाखंड हे समाजात पसरण्याविसाठी जबाबदार आहेत. पक्षाच्या वतीने धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यापेक्षा वेगवेगळी 'अभ्यास केंद्र' काढून नव्या पिढीला दिशादर्शक ज्ञान मिळाले तर बरं होईल.
राष्ट्रमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई, राणी चन्नम्मा, महाराणी येसूबाई, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई या साऱ्या महिला वैभव लक्ष्मी, शत्रूला पळवून लावण्यासाठी यज्ञयाग, शांती इ. इ. करत बसल्या असत्या तर राज्य करु शकल्या असत्या का.?
याचं उत्तर मुलींनो तुम्हाला माहिती आहे. वयाने नाही पण विचाराने मोठ्या व्हा. कृतीशीलतेला महत्त्व देऊया. बघा पटतंय का..??
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)