अहिल्यानगर - बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे निवृत्त लघुलेखक-स्टेनोग्राफर शिवाजी साबळे यांनी न्यू आर्ट्स कॅम्पसचे व्हिजन जपले. त्यांच्यामुळे परिसर सुंदर आणि सुरक्षित राहू शकला.
ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थिनींना आपण सुरक्षित असल्याची जाणीव झाल्यामुळे या महाविद्यालयाची प्रगती झाली आणि संस्थेला तसेच महाविद्यालयाला देशभरात प्रतिष्ठा मिळाली, असे गौरवोद्गगार राज्य शासनाच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष, आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले.
अहिल्यानगर येथील न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे स्टेनोग्राफर लघुलेखक शिवाजी जगन्नाथ साबळे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापुर्ती सन्मान सोहळा, सन्मान कर्तुत्वाचा असामान्य बुद्धिमत्तेचा नव्या इनिंगचा या कार्यक्रमात पवार बोलत होते. ते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सेवापूर्ती निमित्त साबळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, शिवाजी साबळे, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, प्राचार्य डॉक्टर बी. एच. झावरे, जिल्हा बालकल्याण समितीचे चेअरमन जयंत ओहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. अरुण पंधरकर सिनेट सदस्य डॉ. एकनाथ खांदवे, सिनेट सदस्य अमोल घोलप, उपस्थित होते.
तसेच सिनेट सदस्य डॉ. युवराज नरवडे, पुणे विद्यापीठाच्या स्थायी समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. सुभाष कडलग, डॉ. सजनकुमार खपके डॉ. अरुण पवार, प्रा. भाऊसाहेब बानकर, प्रा. शिवाजी बानकर, सरपंच सुभाष पवार, ज्ञानदेव पांडुळे, स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, रवींद्र बारस्कर, निर्मला शिवाजी , तारामती साबळे आदी उपस्थित होते.
पोपटराव पवार म्हणाले की, आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये ज्या पद्धतीने सर्वांच्या प्रयत्नातून एकत्रित परिसर विकासाचे काम झाले, त्याची मुहूर्तमेढ न्यू आर्ट्स महाविद्यालयातच रोवली गेली. आपण सरपंच झाल्यानंतर पहिला राज्यस्तरीय एनएसएसचा कॅम्प हिवरे बाजारमध्ये घेतला. एकत्रित श्रमदानातून गावच्या विकासाला सुरुवात झाली.
न्यु आर्टस् महाविद्यालयाचा मी माजी विद्यार्थी आहे, तिथूनच मला सामाजिक कार्याच्या कामात झोकुन देण्याची प्रेरणा मिळाली. शिवाजी साबळे न्यु आर्ट्स महाविद्यालयात लघुलेखक टंकलेखक म्हणून नोकरी करीत होते. आपली नोकरी काम सांभाळून त्यांनी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे काम केले.
यामुळे शिक्षणासाठी ग्रामीण भागातून आलेल्या युवतींना अधिक सुरक्षित वातावरण मिळाल्याने त्यांचा शिक्षण घेण्याचा रूप वाढला आणि गुणवत्तेत महाविद्यालयाने दाखविलेल्या प्रगतीमुळे महाविद्यालयाचा लौकिक वाढला. महाविद्यालयाला राज्यात प्रतिष्ठा मिळाली.
विशेष कार्यकारी अधिकारी बरोबरच साबळे यांना पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी राज्यपाल मनोनित होण्याचा मान मिळाला. त्याच काळात त्यांनी राज्यपाल आणि कुलगुरूंच्या आग्रहाने आपल्याला देखील तेथे काम करण्याची संधी मिळवून दिली. एखाद्या गोष्टीत घुसून कसे काम करायचे विद्यार्थ्यांच्या हितासाठी एखादी गोष्ट सिनेटमध्ये कशी लावून धरायची याचे चांगले कसब साबळे यांच्याकडे आहे.
ते आता जरी निवृत्त झाले तरी ते सामाजिक जीवनातून निवृत्त होतील असे त्यांचे व्यक्तिमत्व नाही. त्यामुळे संस्था आणि महाविद्यालयाने त्यांना पुन्हा सेवेत घेऊन महाविद्यालयाचा लौकिक वाढवण्यासाठी त्यांची मदत घ्यावी. आमदार संग्राम जगताप यांनी महानगरपालिकेत नगरसेवकपदी त्यांना घेऊन संधी द्यावी आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा समाजाला अधिक कसा उपयोग होईल याचा विचार करावा असे पवार यांनी सांगितले.
आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले की शिवाजी साबळे यांचे सामाजिक काम मोठे आहे. हा माणूस घरात कधी थांबलाच नाही. कुटुंबाला वेळ न देता समाजाला तो दिला. आपल्या पत्नीला नेवासा येथील महाविद्यालयात नोकरी लागली होती. पण तेथे जेव्हा कायमस्वरूपी नियुक्ती देण्याची वेळ आली तेव्हा तेथील एका महिला प्राध्यापिकेने आपल्याला ही संधी मिळावी आपल्या कुटुंबाचे कल्याण होईल. साबळे यांना कायम स्वरूपातील नोकरी आहे अशी विनंती केली. तेव्हा लगेच साबळे यांनी आपल्या पत्नीचा दावा रद्द केला.
हे सहजासहजी कोणी करत नाही. महाविद्यालयातील महिला मुली यांना त्यांनी संरक्षण दिले तेव्हा कोणत्याही परिणामाची परवा त्यांनी केली नाही. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार सोहळा केला.
सत्काराला उत्तर देताना शिवाजी साबळे म्हणाले की, महाविद्यालयाची ३४ वर्ष सेवा करताना महाविद्यालय परिसर विकासाची जबाबदारी आपण समर्थपणे पेलली. परिसर सुरक्षा आणि परिसर विकास या दोन्ही गोष्टी आपण तन-मन-धनाने केल्या. त्यामुळे पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य, शांतता समिती, विशेष कार्यकारी अधिकारी, होण्याची संधी आपल्याला मिळाली.
महाविद्यालयाच्या परिसरात महिला युवती सुरक्षित रहाव्यात याकरता आपण प्रयत्न केले. प्रसंगी गुन्हे अंगावर घेतले. पण आपण कधी कोणाला घाबरलो नाही. त्यामुळे सर्व सेवाकाळात शिवाजीराजे म्हणूनच आपल्याला सर्वांनी मान दिला. या पुढील काळातही आपण सामाजिक शैक्षणिक कार्यात सक्रिय राहू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आपला सत्कार महाविद्यालय परिसराच्या बाहेर इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजित केल्याबद्दल संयोजन समितीचे माजी विद्यार्थी आणि सहकारी प्राध्यापक तसेच आमदार संग्राम जगताप पद्मश्री पोपटराव पवार यांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी बोलताना संस्थेच्या खजिनदार दीपलक्ष्मी म्हसे म्हणाल्या की महाविद्यालयाचे कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या अडीअडचणींसाठी सतत धावून जाणारे साबळे हे व्यक्तिमत्व समाजात लोकप्रिय आहे. आम्हाला जरी काही अडचणी आल्या तरी आम्ही त्यांना सांगितल्या की ते तात्काळ हजर होत आणि त्या सोडवत. पुणे विद्यापीठात महाविद्यालयाला कोणतीच अडचण आली नाही हे त्यांच्यामुळेच शक्य झाले. राज्यात पहिल्या क्रमांकाचा मान आणि देशात चौथा क्रमांक यामुळेच महाविद्यालय मिळवू शकले.
प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे म्हणाले की, साबळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे माजी विद्यार्थी पुढे आले. खरे तर त्यांनी कोणताच विषय शिकवला नाही. शिक्षकेतर कर्मचारी असताना इतका मोठा माजी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद त्यांना मिळणे ही गोष्ट दुर्मिळ आणि प्रशंसनीय आहे.
आम्ही प्राचार्य म्हणून काम करताना बाहेरच्या कॅम्पसमध्ये जर काही घडले, कॉलेजबाहेर काही अडचण आली तर आम्ही साबळे यांनाच निर्देश दिले की ती समस्या चटकन सुटायची. घटना घडली त्या भागात त्यांचा माणूस हजर राहून लगेच मदत करायचा. आम्हाला देखील विद्यापीठ पातळीवर काही अडचणी आल्या आमच्या नोकरीच्या संदर्भात काही तक्रार असल्यास आम्ही त्यांच्याकडूनच त्या सोडवून घेतल्या.
कॉलेजच्या आवाराबाहेर त्यांचा इतका मोठ्या प्रमाणात सत्कार होणे ही एखादी संस्था पुढे जाण्यासाठी खूप आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. यावेळी महिला बालकल्याण समितीचे चेअरमन जयंत ओहोळ स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मेट्रो न्यूजचे संपादक मकरंद घोडके, शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे, निर्मला साबळे, अँड. अनुराधा येवले यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार संपादक विठ्ठल लांडगे यांनी केले. स्वागत अँड शिवाजी डोके यांनी केले तर आभार प्रसाद डोके यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी आणि शिवाजी साबळे सन्मान सोहळा संयोजन समितीचे विठ्ठल लांडगे, मकरंद घोडके, संतोष गाडे, गजेंद्र भांडवलकर, योगेश राखे, अँड. शिवाजी डोके, प्रसाद डोके, मनोज कोतकर, विशाल म्हस्के, वैभव म्हस्के, ओंकार गोडळकर, अजित शिरसाठ, प्रणव कदम, अभिजीत गडाख, वैष्णवी साबळे, सत्यम साबळे, शिवाजी साबळे यांनी परिश्रम घेतले.