सण साजरे करताना त्यामागचे विज्ञान पहायला हवे. आपले पूर्वज अत्यंत बुध्दीमान होते. प्रत्येक सणामागे विज्ञाननिष्ठ नजर आणि त्यानुसार त्यांनी केलेली सणांची आखणी.
ऋतु, त्यावेळी लागणारे पदार्थ, सणांचे साजरीकरण हे सारं पूर्वजांच्या दूरदृष्टीचे फलीत ! जानेवारीमध्ये येणारा संक्रातीचा सणच पहा ना.. पूर्वी शेतीतज्ञ म्हणून बहुतांशी स्त्रीचं काम करत असे. तुम्हाला मी सांगितले आहेच.
आपली शेतीतज्ञ निऋर्तीने नांगर आणि शेतीचा शोध लावला. भूमी, गाय, स्त्री या तिघीमध्ये असणाऱ्या प्रजजनक्षमतेची आणि निरपेक्ष भावनेने पालनपोषण करण्याच्या त्या भावनेचा आदर आपली भारतीय संस्कृती करते.
म्हणून पूर्वीच्या काळात संक्रांतीच्या सणाला प्रत्येक स्त्री पाच महिलांना पाच लहान मातीच्या सुगडांमध्ये पाच बियाणांचे एकत्रित वाण देत असे. या पद्धतीने प्रत्येक स्त्रीला २५ प्रकारची बियाणी मिळत.
हे बियाणे संवर्धन आणि संरक्षणाचे विज्ञानच होते. म्हणजे हे दिवस आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत धान्य 'येण्याचे' आणि पेरण्यांची धान्ये 'तपासण्याचे' आहे.
नंदुरबार जिल्ह्यात आजही अस्तंब्याच्या डोंगरावर दिवाळीच्या काळात लाखो स्थानिक आदिवासी तेथील देवांच्या दर्शनास घरच्या पारंपरिक बियाणांचा नैवेद्य दाखवितात आणि प्रसाद म्हणून तेथे ठेवलेल्या बियाणांची शेतात पेरणी करतात.
याच भागात देवमोगरा या देवाची पूजा होते, त्या वेळी आदिवासी देवमोगरा जातीच्या ज्वारीची कणसे देवीला अर्पण करतात आणि तेथील पुजारी त्याचे प्रसाद म्हणून वाटप करतात. पारंपरिक पौष्टिक वाणाचा हा विज्ञान प्रसारच आहे.
सर अल्बर्ट हॉवर्ड हे ब्रिटनमधील शेती संशोधक प्रत्येक भारतीय शेतकऱ्यास शास्त्रज्ञ म्हणतात, ते याचमुळे. संक्रात म्हणजे संक्रमण. संक्रमण म्हणजे स्थित्यंतर, परिवर्तन, मोठा बदल असा आहे.
एकाच स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणे या दिवसाचा वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टीशी संबंध असल्याने संपूर्ण भारतभर हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते. उत्तरायण म्हणजे काय?
भारतीय शास्त्र प्रमाणे सूर्याचा मकर राशि पासून मिथुन राशि पर्यंत झालेला प्रवास म्हणजे कुठल्या कुठल्या राशी मकर कुंभ मेन मेष वृषभ आणि मिथुन हा उत्तर राहण्याचा काळ ओळखला जातो. हा काळ सहा महिन्यांचा असतो.
आयन म्हणजे सरकणे. सुर्याचे उत्तर दिशेला सरकणे ते सूर्याचे उत्तरायण. 14 किंवा 15 जानेवारीपासून उत्तरायण सुरू होते, त्याला मकर संक्रांत म्हणतात. कारण मकर राशीमध्ये सूर्याचा प्रवेश होतो. काही ठिकाणी याला तीळ संक्रांतही म्हटले जाते.
दिवस मोठा व्हायला लागतो. उष्णता वाढायला लागते. हे संक्रमण आहे. शीतकडून उष्णतेकडे जाणारे अंधाराकडून उजेडाकडे जाणारे संक्रमण उत्तरायणात वसंत भीष्म वर्षा हे मराठी ऋतू येतात.
म्हणून महाभारतातील जेष्ठ व्यक्तीमत्व पितामह भीष्म यांनी प्राण त्यागण्यासाठी उत्तरायणाची वाट पाहिली होती. पूर्वी आपले पूर्वज आरोग्यासाठी रोज सकाळी सुर्योपासना करत. (हल्ली डॉक्टरांनी सांगितले की आपण डी व्हिटॅमिनसाठी कोवळ्या उन्हात फिरायला जातो.)
खरंतर या महिन्यात हिंदू धर्म संस्कृतीत दानाचा महिना म्हणतात. खरंतर दान म्हणजे देणे, ही दातृत्वाची भावना वाढीस लागावी, हीच भावना यामागे असावी.
संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानी मिनव्यै:
तानि नित्यंम ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि !
अर्थात-संक्रांतीला जी माणसे दान देतात, हव्यकव्यै (यज्ञयाग) करतात, त्या त्या वस्तू सुर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. म्हणजे काय पेराल तर उगवेल. दान म्हणजे विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान, विचारदान याही गोष्टींचा समावेश होतो...! ही आहे संक्रांतीची विज्ञान कथा.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)