ज्येष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी यांचा 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मान

येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा

अहिल्यानगर - नुकतेच नगरमध्ये झालेल्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी प्रवीण कुलकर्णी तथा पी. डी. काका यांचा नाट्य परिषदेच्या अहिल्यानगर उपनगर शाखेच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे व संमेलनाध्यक्ष पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पी. डी. कुलकर्णी यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले, विश्वस्त मोहन जोशी, अशोक हांडे, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, सिनेनाट्य अभिनेते भरत जाधव, विभागीय नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. बापूसाहेब कांडेकर, संमेलन प्रमुख क्षितिज झावरे, उपनगर शाखा अध्यक्ष प्रसाद बेडेकर, प्रमुख कार्यवाहक चैत्राली जावळे, व परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

'पीडी' काका म्हणून परिचित असलेले पी. डी. कुलकर्णी हे तब्बल पाच दशकांपासून रंगभूमीची सेवा करीत आहेत. आजही ते त्याच उत्साहाने योगदान देत आहेत. नगरमधील नव्या, जुन्या हौशी रंगकर्मींसाठी ते हक्काचे मार्गदर्शक आहे. विभागीय मराठी नाट्य संमेलनाच्या अवघ्या २० दिवसांच्या तयारीत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि सक्रिय योगदान दिले.

बॅंकिंग क्षेत्रात नोकरी, क्रीडा, साहित्य अशा विविध क्षेत्रात योगदान देताना त्यांनी सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले आहे. रंगभूमी म्हटले की आज वयाच्या सत्तरीतही त्या़ंचा उत्साह तरूणांनाही लाजवणारा असतो. स्वतः उत्तम अभिनेते, दिग्दर्शक असलेले पी. डी. कुलकर्णी उत्तम कलाकार घडवणारे शिक्षकही आहेत. अनेक जणांना त्यांनी प्रथम रंगभूमीवर काम करण्याची संधी दिली.

नगरचे भूषण असलेले पीडी काका गेल्या ५० वर्षाहून अधिक काळ रंगभूमीवर कार्यरत असलेले नगरमधील एकमेव रंगकर्मी आहेत. २२ वर्षांनंतर नगरमध्ये मराठी नाट्य संमेलन होत असताना त्यांचा नाट्य परिषदेने सर्व रंगकर्मी व नाट्य रसिकांच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !