अहिल्यानगर - नवीन वर्षाची सुरूवात नगरकरांसाठी मोठी सांस्कृतिक मेजवानीची ठरणार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेने १०० वे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाचा मान अहिल्यानगर उपनगर शाखेला दिला आहे, अशी माहिती नियामक मंडळ सदस्य क्षितिज झावरे यांनी दिली.
या गौरवशाली संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी जबाबदारी स्वीकारलेली असून या संमेलनाचे निमंत्रकपद आमदार संग्राम जगताप भूषवणार आहेत.
दि. २६ व २७ जानेवारी २०२५ रोजी हे विभागीय नाट्य संमेलन माऊली सभागृह व पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती शाखेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर यांनी दिली.
नाट्यसंमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत दोन दिवस विविध नाट्यविषयक कार्यक्रम पार पडणार आहेत. ज्यामध्ये बालनाट्य महोत्सव, नाट्य कलाकार परिसंवाद, चर्चासत्र, प्रशिक्षण शिबिरे, विविध स्पर्धा होणार आहेत.
सिने-नाट्यसृष्टीतील दिग्गज कलाकार, रंगकर्मी संमेलनास उपस्थित राहणार आहेत अशी माहिती स्वागताध्यक्ष डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी दिली. या दोन दिवसात नगरकर रसिकांना अनेक उत्तम प्रायोगिक, संगीत आणि व्यावसायिक नाटके पाहण्याची संधी मिळणार आहे.
नगर जिल्ह्यातील सर्व नाट्य कलाकार रसिक प्रेक्षक यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नाट्य परिषद नगर शाखा, संगमनेर शाखा, शेवगाव शाखा तसेच बाल रंगभूमी परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य एकत्र येऊन हे संमेलन यशस्वी करतील, असे मध्यवर्ती कोषाध्यक्ष सतीश लोटके, नियामक मंडळ सदस्य संजय दळवी यांनी सांगितले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अहिल्यानगर उपनगर शाखेचे सर्व सदस्य, जिल्ह्यातील नाट्यकर्मी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी काम करत आहे, असे प्रसिध्दीप्रमुख अविनाश कराळे यांनी सांगितले.