अहिल्यानगर - येथील दौंड रोडवरील मेहराबाद (अरणगाव) मधील मेहेरबाबाच्या टेकडीवरील समाधी स्थळी ५६ वी अमरतिथी (पुण्यतिथी) सोहळा आजपासून प्रारंभ झाला आहे. त्यानिमित मोठ्या संख्नेने कालपासून भाविक येण्यास सुरवात झाली आहे. आज पहाटेपासून समाधीचे दर्शन घेण्यास रांगा लागल्या आहेत.
सुमारे एक लाखाहून अधिक मेहेरप्रेमी भारतातून आले आहेत. दि १ फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा होणार आहे. दर्शनासाठी टोकन पद्धत वापरली जाते. त्यामुळे गडबड, गोंधळ होण्याचा संभव नसतो. एका वेळेस पाचशे लोकांना टोकन दिले जाते. त्याच नंबरप्रमाणे दर्शनास सोडले जाते.
दर्शनाची वेळ आधी सांगितली जाते. त्याप्रमाणे भाविक रांगेत उभे राहतात. त्यांच्यासाठी दर्शन रांग व त्यावरील मंडप, पिण्याच्या पाण्याची व बसण्याची व्यवस्था ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर असलेली मेहराबाद येथील टेकडी मेहेरप्रेमींनी फुलून गेली आहे.
अवतार मेहेरबाबा की जयचा जयघोष करत आहेत. सकाळी १० वाजता बाबाच्या प्रतिमेचे पूजन करून विविध भाषेतून आरती प्रार्थना म्हणून अमरतिथीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी ४० हजार भाविक बसतील, असा भव्य मंडप आहे.
मेहेरप्रेमी भजने, गजल, नृत्ये, कव्वाली, गाणे, नाटिका सादर करतील. तसेच बाबांवरील फिल्म दाखवण्यात येतील. संपूर्ण तीन दिवसभर हा कार्यक्रम चालू राहणार आहे. एसटीने येणाऱ्या भाविकांसाठी तीनही बसस्टेशनवरुन मेहेराबादला बसेस सोडण्यात येत आहेत.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमणावर आहे. अग्निशामक दल तैनात केलेले आहे. अनेक उपहारगृहे, प्रसादाची दुकाने, बाबाची फोटो, किचेन आदि विविध वस्तूची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. तर हजारो युवक, युवती स्वयंसेवकाचे काम करत आहेत.
मेहेरबाबांचे असंख्य भक्त जगात असून असंख्य केंद्रेही आहेत. सर्व जाती धर्मातील लोकांना मानवतेचा व सत्याचा संदेश देत त्यांनी जगभर प्रवास केला. जगात मी कोठेही देह सोडला तरी मेहेरावाद येथे बांधलेल्या समाधीत मला समाधीस्त करावे असे त्यांनी सांगून ठेवले होते.
३१ जाने १९६९ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले. म्हणून या ठिकाणी अमरतिथी सोहळयासाठी लाखो भाविक येत असतात. यंदाही या सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.