अहिल्यानगर - मैत्री ही कुणाशीही होऊ शकते. त्याला कोणतेही बंधन नाही. हाच धागा पकडून गेल्या दोन वर्षांपासून नगरमध्ये होत असलेल्या ‘मैत्री कट्टा’ या उपक्रमाचा द्वितीय वर्धापनदिन शनिवारी (११ जानेवारी) माऊली सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता होत आहे.
यावेळी ‘खास रे’फेम संजय कांबळे, लेखक व हौशी छायाचित्रकार नंदकुमार देशपांडे, चित्रकार के. नमिता प्रशांत व साहित्यिक अभिरूची ज्ञाते उपस्थित राहून रसिकांशी मैत्रीपूर्ण संवाद साधणार आहेत. त्यांच्या माध्यमातून यंदा अमृतमहोत्सवी कट्टा रंगणार आहे.
काही मित्रांच्या संकल्पनेतून ‘मैत्री कट्टा’ हा उपक्रम साकारला गेला. त्याअंतर्गत महिन्यातून दोनदा शुक्रवारी हा उपक्रम लक्ष्मी फोटो स्टुडिओ येथे होतो. त्यात स्वतःच्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्ती आपल्या यशाच्या प्रवासाबरोबरच मैत्रीचे रंग उलगडून दाखवतात.
आतापर्यंत येथे 71 मैत्री कट्टे पूर्ण झाले. कट्ट्याच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्ताने येत असलेल्या चार प्रमुख पाहुण्याच्या रूपाने आता अमृतमहोत्सवी कट्टा साजरा होत आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहणारे ‘खास रे टिव्ही’फेम संजय कांबळे हे मराठी रॅप सिंगर असून त्यातून ते अनेक सामाजिक समस्या मांडत असतात. त्यामुळे ते लोकप्रिय झाले आहेत.
नंदकुमार देशपांडे हे लेखक आणि हौशी छायाचित्रकार आहेत. विज्ञान शाखेत पदवी आणि व्यवस्थापन शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी न्यू इंडिया अश्यूरन्स या विमा कंपनीत नासिक, पुणे, मुंबई येथे विविध पदांवर नोकरी केली. त्यांनी विविध नाटकात भूमिका आणि दोन लघुपटांची निर्मिती केली आहे.
के. नमिता प्रशांत जगण्यावर भरभरून प्रेम करणारी जिंदादिल व्यक्ती आहे. त्या म्यूरल आर्टिस्ट असून त्यांना पर्यटनाची आवड आहे. पारंपारिक कला तसेच प्राचीन आदिवासी कला जोपासायला आवडतात.
अभिरुची ज्ञाते या प्रवासवर्णन साहित्यिक, भाषाप्रेमी आहेत. पुण्यातल्या अक्षरनंदन शाळेत मराठी भाषेच्या शिक्षिका आहेत. मैत्रीचा उत्सव साजरा करणार्या या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘मैत्री कट्टा’ समितीने केले आहे.