'ही' काळजी घ्या आणि ‘जीबीएस’वर उपाययोजना करा : आरोग्यमंत्री


पुणे - गुलियन बॅरे सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ पसरलेल्या भागातील या आजारामागची कारणे शोधण्यासह पाणीपुरवठा स्रोतांची, पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी व शासकीय टँकरमधील पाण्याची तपासणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवाहन तसेच जनजागृती करणे आदी सर्वंकष उपाययोजना कराव्यात, असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिले.

आजारातून बरे होण्याचे प्रमाण मोठे असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही ते म्हणाले. विधानभवन येथे ‘जीबीएस’ आजाराविषयी आढावा बैठकीत मंत्री आबीटकर बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, राज्याचे आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन आंबाडेकर, उपस्थित होते.

प्रभारी अतिरिक्त विभागीय आयुक्त समिक्षा चंद्राकार, सहसंचालक आरोग्य सेवा बबीता कमलापूरकर, उपसंचालक डॉ. आर. बी. पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, पुणे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे, पिंपरी चिंचवड मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे उपस्थित होते.

आरोग्यमंत्री आबीटकर म्हणाले, प्रामुख्याने हे रुग्ण आढळलेल्या भागातील पाण्यांचे नमुने घेऊन त्याची तपासणी करावी. आजारातील बहुतांश रुग्ण बरे होत असून एकदम थोड्य रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता पडत आहे. त्यामुळे नागरिकांना घाबरुन जाऊ नये, याबाबत वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करावी.

पाणी उकळून पिणे, स्वत:ची रोगप्रतिकारक्षमता वाढविणे तसेच स्वच्छ पाण्याचा आग्रह धरणे या उपाययोजना महत्त्वाच्या असून त्याबाबत जनजागृती करावी. यावेळी मंत्री आबीटकर आणि विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी राज्य शासनाचे आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच पुणे महानगर पालिका यांच्याकडून आढावा घेतला

या आजाराचे आजअखेर १११ आणि आज ससून रुग्णालयाने कळविल्याप्रमाणे १० संशयित रुग्ण आढळले आहेत. रुग्ण हे प्रामुख्याने सिंहगड रोड, खडकवासला, किरकिटवाडी, नांदेडगाव, नांदेडसिटी, धायरी, आंबेगाव या पुणे महानगरपालिका क्षेत्रातील तर काही रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा आणि इतर जिल्ह्यातील आहेत.

या रुग्णांचा योग्य मार्ग (ट्रेस) ठेवण्याची व्यवस्था करावी. जेणेकरुन त्यांना कोणत्या कारणामुळे हा आजार झाला हे कळून येईल. दररोजच्या रुग्णांची संख्या आणि बरे होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी दररोज न चुकता सायंकाळी अद्यावत करावी.

त्यासाठी रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयांशी संपर्क साधण्यासाठी आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेने संपर्क अधिकारी नेमावेत. बाटलीबंद पाण्याचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासावेत.

जारमधून विकल्या जाणाऱ्या पाण्याची महानगरपालिकांच्या आरोग्य विभागाने तपासणी करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. पुणे महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती महानगरपालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी दिली.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !