अहिल्यानगर - बालनाट्य स्पर्धा ही केवळ स्पर्धा नसून महोत्सव आहे. बालरंगभूमी ही कलाकार घडवणारी तालीम आहे. या स्पर्धेतून अनेकजण घडले आहेत. मुलांच्या अंगातील सुप्त कलागुणांना या स्पर्धेमुळे वाव मिळतो.
पालकांनी मुलांचा कल ओळखून त्यांच्या भवितव्याविषयी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मुंबई मध्यवर्ती शाखेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके यांनी केले.
राज्य शासनाच्या एकविसाव्या बाल नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. नंतर दीपप्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी नाट्य परिषदेच्या अहिल्यानगर उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रा. प्रसाद बेडेकर, स्पर्धेचे परीक्षक राज गुंगे (सोलापूर), सचिन गिरी (अकोला), डॉ. संयुक्ता थोरात (नागपूर), बाल कलाकार आरूष बेडेकर, तसेच समन्वयक सागर मेहेत्रे, सहसमन्वयक जालिंदर शिंदे, विकी साळवे आदी उपस्थित होेते.
याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी स्पर्धकांना दिलेल्या शुभेच्छांची चित्रफीत दाखविण्यात आली. माऊली सभागृहात १३ जानेवारीपर्यंत चालणार्या या स्पर्धेतील प्रयोग पाहून स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रास्ताविक प्रा. बेडेकर यांनी व सूत्रसंचालन सागर मेहेत्रे यांनी केले. जालिंदर शिंदे यांनी आभार मानले. उद्घाटनापूर्वी ‘चम चम चमको’ हा स्पर्धेतील पहिला प्रयोग सादर करण्यात आला. शब्दगंध साहित्यिक परिषदेने सादर केलेल्या या नाटकाचे लेखक धनंजय सरदेशपांडे आहेत.
अबोली आगटे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले. मुलांवर अवास्तव अपेक्षा लादू नये, हा विषय घेऊन सादर झालेल्या या नाटकाने स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली.