येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - पुणे पोलिस दलातील बीडीडीएस ( बॉम्ब शोधक व नाशक पथकातील ) जांबाज श्वान ‘तेजा’ नुकताच पोलीस दलातील आपली १० वर्षाची नोकरी (कामगिरी) करून निवृत्त झाला आणि ‘माऊली’ परिवारात त्याच्या पुढच्या शांत आणि निवृत्त आयुष्यासाठी दाखल झाला. अनेक महत्वाच्या कामगिरी त्याच्या नावावर आहेतच, पण तेजा ‘व्हीआयपी सिक्युरिटी’मध्ये खूप प्रवीण आहे. जी २० परिषदेमधील सुरक्षा, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या वेळी ‘तेजा’ने सुरक्षेची जबाबदारी सांभाळली आहे.
या अत्यंत गुणी, कर्तव्यदक्ष श्वानाला ‘माऊली’च्या कामावर विश्वास दाखवून ‘माऊली’च्या हवाली करणारे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, बीडीडीएसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक येळे, पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, तेजाचा मुलाप्रमाणे सांभाळ करणारे एएसआय श्रीमंत, हवालदार डेंगळे दादा आणि त्याच्यावर प्रेम करणारे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे ‘माऊली’च्या वतीने आभार.
‘माऊली’ची सगळी मोठ्या वयाची बच्चे कंपनी तेजाला आणण्यासाठी पुण्याला आली होती. ‘माऊली’च्या मनगाव प्रकल्पामध्ये सध्या अजून ५ श्वान असून त्यांचा उपयोग मानसिक आजारावर ‘थेरपी डॉग’ म्हणून केला जातो. ‘लॅब्रेडोर’ जातीच्या श्वानाचा ‘थेरपी डॉग’ म्हणून फार चांगला उपयोग होतो आणि त्याचा येथील रुग्णांना फायदा होत असतो.
‘माऊली’च्या ‘मनगाव प्रकल्पा’त सध्या ४७७ महिला व येथेच जन्मलेली ४१ मुले कायमस्वरूपी राहत असून. अनेक मूले मोठी झाली आहेत. काही उच्च शिक्षण घेत आहेत, तर काही अहिल्यानगर येथील आठरे पाटील पब्लिक स्कुलमध्ये शिक्षण घेत आहेत. ‘माऊली’त दाखल अनेक माता भगिनी विविध राज्यांमधून, विविध शासकिय रुग्णालये आणि अस्थपणाच्या माध्यमातून येथे कायमस्वरूपी निवारा, उपचार आणि पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या आहेत.
साधारण शंभरावर महिला वयस्क असून ‘डिमेन्शिया’ आणि ‘अल्झायमर’ या विकाराने ग्रस्त आहेत. त्यांचे सगळे जागेवरच करावे लागते. त्यासाठी मनगाव येथे स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. अत्यवस्थ महिला रुग्णांसाठी अत्याधुनिक अतिदक्षता विभाग कार्यरत आहे.
अनेक महिला आता मानसिक आणि शारीरिक आजारामधून बऱ्या होत स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. त्यासाठी ‘माऊली बेकरी’, अत्याधुनिक ‘डेअरी प्रकल्प’ उभारून त्यामध्ये त्या सहभागी होवून सक्षम होण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘माऊली’ला आजही कुठलेही शासकीय अनुदान मिळत नाही व त्याची अपेक्षा नाही.
लोकसहभागामधून ‘माऊली’चे सर्व प्रकल्प सुरू असून. ‘माऊली इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ हे तीनशे खाटांचे अत्याधुनिक धर्मादाय रुग्णालय उभारणीही करण्यात येत आहे.