लहानपणी आईकडून एक गोष्ट ऐकतांना खुप कुतूहल वाटायचं. एक जादूई चिराग अल्लाउद्दीनच्या हाती असायचा, अल्लाउद्दीन चिरागला स्वतःला हवी असणारी वस्तू द्यायचा हुकूम करायचा, "मुझे अभी दस हजार रुपये चाहिए" चिराग अल्लाउद्दिनचा हुकूम शिरसावंद्य मानून, "जी मेरे आकां" म्हणत क्षणात दहा हजार रुपये अल्लादिनच्या हातात ठेवायचा.
तेव्हा आपलेही कुतूहल जागृत होऊन आपण आपल्या छोट्याश्या हातांनी आनंदाने टाळी वाजवायचो. या गोष्टीला आता अनेक वर्ष झाली, माझ्या मनातून हा 'आका' अन् अल्लाउद्दीन काळाच्या ओघात लुप्तही झाला, अन् त्याबरोबर जादूई 'चिराग'ही...!
सध्या "आका" नावाचा धुमाकूळ चालू आहे, टिव्ही असो की वर्तमान पत्र, "आका" डोकं वर काढतोच आहे. सर्वत्र आकाची चर्चा. बालपणी या आकाच्या गोष्टी ऐकण्याच कुतूहल वेगळं आणि आताचा आका शूट करण्याच्या ऑर्डर देतं सुटलंय.
हल्लीची समाज व्यवस्थाच बदलली आहे. पदाची गरिमा, कर्तव्य, सेवेचं भान राहिलं नाही. स्वतःसाठी खोऱ्याने पैसा कमवायचा आहे. चार, दोन शूट झाले तरी चालतील, निष्पाप कुटुंबे बरबाद झाली तरी.
विचारधारा संपत चालली आहे. पुर्वी राजकारणी नेते आपल्या पक्षाचे विचार जगत होते. त्यातच त्यांचं सूख दडलेलं असायचं. आणि आता मतदार राजा निवडणुकीत अर्ध्या क्वार्टर आणि पाचशे रुपयात सांगाल तसे बटन दाबतोय.
शोकांतिका आहे लोकशाहीची. हैदोस घातला जातोय, भ्रष्ट राजकारण्यांची वरात निघालीय. सरळ माणसं टिकत नाहीत, दाबली जात आहेत. अपेक्षा करायची तरी कोणाकडून? आपले 'हिरो'ही आपल्याला 'भाईगिरी'वाले हवेत. लाचार झालीत सारी. इतकं भयानक वास्तव की आपणच आपला गळा दाबून, संपवावं स्वतःला. एवढंच वाटतं.!
- जयंत येलुलकर, (मा. नगरसेवक, अहिल्यानगर)