येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - राज्याचे उद्योगमंत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते अहिल्यानगर येथील १०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचे स्व. सदाशिव अमरापूरकर नाट्यनगरी येथे शानदार उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्राची लोककला सर्वदूर पोहोचवण्यासाठी राज्यातील गड-किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा लोककलांचा माध्यमातून सादर करण्याबाबत लवकरच प्रयत्न करण्यात येईल, असे सामंत यावेळी म्हणाले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अहिल्यानगर उपनगर शाखेतर्फे आयोजित या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त व ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते मोहन जोशी, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, स्वागताध्यक्ष डॉ. बापूसाहेब कांडेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, शिरीष मोडक, नाट्यपरिषदेच्या मध्यवर्तीचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, दिलीप कोरके, दीपा क्षीरसागर, सतीश लोटके, अहिल्यानगर उपनगर शाखेचे अध्यक्ष प्रसाद बेडेकर, प्रमुख कार्यवाह चैत्राली जावळे, अमोल खोले यांच्यासह नाट्य परिषदेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
अहिल्यानगर येथील विभागीय नाट्यसंमेलन ऐतिहासिक असून नवे कलाकार घडविण्याचे कार्य अहिल्यानगर नाट्य परिषद शाखेने नेहमी केल्याचे नमूद करून सामंत म्हणाले, हौशी आणि प्रायोगिक रंगभूमी पासून व्यावसायिक रंगभूमीकडे जाणारे कलाकार घडविण्याची गरज आहे. राज्यात लोककला, संगीत क्षेत्राच्या विकासात ज्येष्ठ कलाकारांचे मोठे योगदान आहे.
शहरात नाट्यगृहाची सुविधा करतांना व्यावसायिक नाटकांवर होणारा खर्च कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी नाट्यगृहांमध्ये सौर ऊर्जेचा वापर होणे गरजेचे आहे. स्थानिक हौशी रंगभूमी कलाकारांना कमी दराने नाट्यगृह उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. मराठी भाषेच्या विकासासाठी चांगल्या सूचना आल्यास त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तसेच अहिल्यानगर परिसरात ३ हजार ५०० कोटींचे प्रकल्प उभे राहणार असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. दावोस येथे देखील जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी करार करण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, जिल्ह्यात २२ वर्षापूर्वी नाट्यसंमेलन झाले होते. या माध्यमातून नवीन कलाकार घडविण्याचे कार्य होते. यावर्षी विभागीय नाट्यसंमेलनाचे आयोजन करतांना १०१ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अहिल्यानगर शहराला मिळाल्यास त्याचेही यशस्वीपणे आयोजन करण्यात येईल. शहरात नाट्यगृह उभे रहात आहे. शहराचा औद्योगिक विकासही वेगाने होत आहे, तसेच नाट्यसंमेलनाच्या माध्यमातून नवनवीन कलाकार घडविण्याचे कार्य व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांनी विभागीय नाट्यसंमेलन सुनियोजित असल्याचे नमूद करून अहिल्यानगर उपनगर शाखेचे आयोजनाबद्दल अभिनंदन केले. अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले, नवोन्मेष आणि नवी ऊर्जा असलेल्या रंगकर्मींसाठी ठोस कामगिरी होईल. हौशी रंगमंच सशक्त झाल्यास व्यावसायिक रंगभूमीला बळ मिळते.
प्रायोगिक रंगभूमीसाठी गावोगावी मंच उभे राहिल्यास व्यावसायिक रंगभूमी सशक्त होते. राज्य पातळीवर यशस्वी एकांकिका ठिकठिकाणी दाखविण्यात याव्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांवर लोककलाकारांच्या माध्यमातून शौर्याची गाथा मांडली गेल्यास नव्या पिढीला प्रेरणा मिळेल. रंगकर्मी जेवढे मोठे होतील तेवढा समाजातील एकोपा टिकून राहील, असेही त्यांनी सांगितले.
स्वागताध्यक्ष डॉ. कांडेकर आणि प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. विभागीय नाट्यसंमेलन प्रमुख क्षितिज झावरे यांनी प्रास्ताविकात विभागीय नाट्यसंमेलन विषयी माहिती दिली. अध्यक्ष प्रसाद बेडेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा झावरे व अभिजित क्षीरसागर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रमुख कार्यवाह चैत्राली जावळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनानिमित्त अहिल्यानगरच्या १०० कलाकारांनी नांदी आणि १०० कलाकारांनी स्वागत नृत्य सादर केले. विभागीय नाट्य संमेलनाची सुरुवात नाट्यदिंडीने करण्यात आली. प्रोफेसर कॉलनी चौकापासून संमेलन स्थळापर्यंत नटराजाच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले.
या दिंडीमध्ये अभिनेते मोहन जोशी, कमलाकर सातपुते, प्रेमानंद गज्वी, अभिनेत्री माधवी निमकर यांच्यासह अनेक लोककलावंत व स्थानिक कलाकार सहभागी झाले होते. उद्घाटनानंतर संगीत रजनी हा कार्यक्रम सादर झाला. रसिकांनी या कार्यक्रमाला मोठी दाद दिली.