ग्राहक न्यायालयाचा दणका ! 8 हजाराच्या बदल्यात ग्राहकाला 22 हजार देण्याची रेडमी मोबाईल कंपनीवर नामुष्की

येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा

नाशिक :  ग्राहकाला आठ हजार रुपयांचा खराब मोबाईल दिल्या प्रकरणी थेट संबंधित ग्राहकाच्या खात्यात 22 हजार रुपयांचा परतावा जमा करण्याची नामुष्की जागतिक दर्जाच्या रेडमी कपंनीवर आल्याने मोबाईल इंडस्ट्रित एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ऍड. उमेश अनपट यांनी ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. मोहसीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली फसवणूक झालेल्या ग्राहकाची बाजू सक्षमपणे जिल्हा ग्राहक न्यायालयात मांडली.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील नानासाहेब पवार यांनी एमआय रेडमी कंपनीचा मोबाईल विकत घेतला. मात्र, तेंव्हापासूनच मोबाईलमध्ये त्रुटी होत्या. या बाबत संंबंधित दुकानदार आणि मोबाईल कंपनीस त्यांनी मोबाईल दुरुस्त करून अथवा बदलून देण्याची वारंवार विनंती केली. परंतु, त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्रस्त झालेले पवार यांनी मोबाईल दुकानदार व  शाओमी इंडिया (एमआय ) रेडमी मोबाईल कंपनी म्हणजेच शाओमी टेकनॉलॉजी इंडिया प्रा. लि. विरोधात नशिक येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात ऍड. उमेश अनपट यांच्या माध्यमातून तक्रार दाखल केली.

ऍड. उमेश अनपट यांनी मांडली बाजू : या प्रकरणी तक्रारदार पवार यांची बाजू ऍड. उमेश अनपट यांनी सक्षमपणे न्यायालयात मांडली. न्यायालयासमोर सादर केलेल्या पुराव्यांच्या आणि मांडलेल्या युक्तीवादाच्या आधारे न्यायालयाने शाओमी टेकनॉलॉजी इंडिया प्रा. लि. म्हणजेच एमआय रेडमी कंपनीला आदेशीत केले


ऍड. मोहसीन सय्यद यांचे मार्गदर्शन : सदर न्यायालयीन खटला ऍड. उमेश अनपट यांनी जेष्ठ विधिज्ञ ऍड. मोहसीन सय्यद यांनी वेळोवेळी केलेल्या बहुमूल्य मार्गदर्शनाखाली लढवला. त्यांचे मार्गदर्शन या खटल्यात मोलाचे ठरले. 

आदेशात काय म्हटलंय? :  शाओमी टेकनॉलॉजी इंडिया प्रा. लि. म्हणजेच एमआय रेडमी कंपनीने तक्रारदार यांना नवीन मोबाईल अथवा मोबाईलची  किंमत द्यावी. तसेच फोन खरेदी केल्यापासून म्हणजेच दि. 4/12/2022 पासून ते प्रत्यक्ष पूर्ण रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे. प्रमाणे 10 % व्याजापोटी तक्रारदारास द्यावी. तसेच  झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.7,000/- (सात हजार) व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- (पाच हजार) अदा करावेत.


मोबाईल ग्राहकांसाठी दिशादर्शक आदेश : सदर आदेश आणि त्याची झालेली अंतिम अंमलबजावणी ही घटना बाजारात अंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठं मोठ्या मोबाईल कंपन्याकडून फसवणूक होणाऱ्या मोबाईल ग्राहकांसाठी अत्यंत  दिशादर्शक ठरणार आहे. फसवणूक होणाऱ्या ग्राहकांनी आपल्या न्याय हक्कासाठी जिल्हा ग्राहक मंचात न्याय मागितल्यास न्याय मिळू शकतो, हेच या निकालातून प्रतीत होते.

या न्याय मंचासमोर चालला खटला : नशिक येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात हा खटला चालला. जिल्हा न्याय मंचाच्या अध्यक्षा न्यायाधीश मंदाकिनी एस. भोसले, सदस्या न्यायाधीश प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, सदस्या न्यायाधीश प्रेरणा महाजन-लोणकर यांच्या समोर या खटल्याचे कामकाज चालले. सदस्या न्यायाधीश  प्रेरणा महाजन-लोणकर यांनी वरील आदेश पारीत केले.


थेट ग्राहकाच्या खात्यात परतावा : रेडमी मोबाईल कंपनीच्या फसवणुकीमुळे श्री. पवार हे अनेक महिने त्रस्त होते. त्यांनी अखेर जिल्हा ग्राहक न्यायालयात दाद मागितली. मात्र कपंनी प्रतिसाद देत नव्हती. स्वतःची चूक दुरुस्त करण्याच्या मानसिकतेत नव्हती. अखेर न्यायालयाने एकतर्फी ग्राहकास भरपाई देण्याचा आदेश देत   रेडमी कंपनीला जोरदार दणका दिला.  या आदेशामुळे कपंनीला थेट ग्राहक श्री. पवार यांच्या बँक खात्यावर सदर 22 हजार 53 रुपये जमा करून अखेर आपली झालेली चूक दुरुस्त करावीच लागली.


लढल्यावर न्याय मिळतोच : ग्राहकांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्यायालयात दाद मागितल्यास निश्चितपणे न्याय मिळतो याची प्रचिती मला माझ्यावरील आपबीतीतून आली. मी दाद मागण्याचे ठरविले आणि पुढे चालत गेलो शेवटी न्याय मिळालाच. ही माझ्यासारख्या सर्व सामान्य ग्राहकाच्या दृष्टीने लाखमोलाची बाब आहे. हा निवाडा निश्चितपणे माझ्या सारख्या फसवणूक झालेल्या ग्राहकांचे मनोधैर्य वाढवून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पाठबळ देणारा ठरेल, असे मला वाटते. - नानासाहेब पवार, (फसवणूक झालेले ग्राहक)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !