अहिल्यानगर - स्नेहालय उडान प्रकल्प, युवा निर्माण प्रकल्प आणि रोटरी क्लब श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर येथे ११ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
स्नेहालय उडान प्रकल्प, युवा निर्माण प्रकल्प आणि रोटरी क्लब श्रीरामपूर यांनी एकत्रितपणे मुलींच्या हक्क आणि सुरक्षिततेबद्दल जनजागृती मोहीम राबवली.
या मोहिमेअंतर्गत श्रीरामपूर शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन मुलींमध्ये बाल लैंगिक शोषण प्रतिबंध, बालविवाह, बालतस्करी आणि मुलांचे संरक्षण कायदे यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या मोहिमेद्वारे दोन हजारपेक्षा जास्त मुलींना त्यांच्या हक्कांची माहिती देण्यात आली आणि त्यांना आपले अधिकार बजावण्यास सक्षम करण्यात आले.
यावेळी स्नेहालय उडान प्रकल्पाच्या मानद संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर, संचालक हनिफ शेख, आणि उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रविण कदम यांनी मुलींना समोरासमोर संवाद साधून मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रोटरी क्लब श्रीरामपूरचे अध्यक्ष डॉ. अजित घोगरे यांनी मुलींना आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी संदेश दिला.
या मोहिमेसाठी रोटरी क्लबचे सचिव उद्धव तांबोळी, सदस्य पाटणी, युवा निर्माण प्रकल्पाचे व्यवस्थापक विकास सुतार, तसेच स्नेहालय उडानचे कार्यकर्ते आणि युवकांनी विशेष प्रयत्न केले. या मोहिमेमुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला असून त्यांच्या हक्कांबाबतची जागरुकता मोठ्या प्रमाणात वाढली.
आंतरराष्ट्रीय बालिका दिन : 2012 पासून हा दिवस मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी विशेष महत्त्वाचा ठरला आहे. या निमित्ताने जगभरातील मुलींना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली जाते.
या मोहिमेचा उद्देश : मुलींच्या हक्कांची जागरूकता वाढवून त्यांना समाजातील विविध समस्यांपासून सुरक्षित ठेवणे आणि त्यांना शिक्षण, आरोग्य आणि स्वातंत्र्याचे हक्क मिळवून देणे.