अहिल्यानगर - जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्ते संजय कोतकर व वसंत ठुबे यांची दिनांक ७ एप्रिल २०१८ रोजी निवडणुकीच्या वादातून हत्या झाली होती. या दुहेरी खुनामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ माजली होती. या प्रकरणामध्ये जिल्ह्यातील प्रभावी राजकीय कुटुंबातील संदीप कोतकर याचाही समावेश होता.
दरम्यान आरोपी संदीप कोतकर याने या दुहेरी खून खटल्यात जिल्हा न्यायालय मध्ये जामिनासाठी अर्ज केला होता. जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर करताना त्याला नगर जिल्ह्यामध्ये बंदी करण्यासंबंधी अट घातली होती.
या अटीतून सवलत मिळण्यासंबंधी आरोपी संदीप कोतकर यांनी जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने मूळ फिर्यादी यांच्या वतीने या प्रकरणात जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. त्या अनुषंगाने न्यायालयाने आज कोतकर याचा अर्ज निकालासाठी ठेवला होता.
दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या सवलतीचा दरुपयोग करून संदीप कोतकर याने काल नगर जिल्ह्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करून विनापरवानगी जंगी मिरवणूक काढली होती.
ही मिरवणूक केडगाव मधून जात असताना संदीप कोतकर व त्याचे सहकारी यांनी फिर्यादी संग्राम कोतकर यांच्या आईला धमकावल्यासंबंधी संग्राम कोतकर यांनी काल कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
त्याचप्रमाणे मिरवणुकीच्या दरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यासंबंधी कोतवाली पोलीस स्टेशन यांनी वेगळी फिर्याद दाखल केली आहे.या दोन्ही फिर्यादीच्या अनुषंगाने कोतकरच्या राजकीय अडचणीमद्धे वाढ होणार आहे.
या दोन्ही फिर्यादीच्या अनुषंगाने फिर्यादी यांनी आज जिल्हा न्यायामध्ये शपथपत्र दाखल करून आरोपी संदीप कोतकर यांनी न्यायालयाने दिलेल्या जामिनाचा दुरुपयोग करून फिर्यादी यांच्या आईला धमकावले संबंधीची तक्रार दाखल झाल्याची माहिती न्यायालयाला दिली.
त्याचप्रमाणे आरोपी कोतकर यांच्या जिल्हा प्रवेशामुळे नगरमधील विधानसभेची निवडणूक भयमुक्त वातावरणात होऊ शकत नसल्यासंबंधीचे विवेचन न्यायालयासमोर केले होते.
एकंदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच मूळ फिर्यादी यांच्यातर्फे केलेला युक्तिवाद लक्षत घेऊन न्यायालयाने संदीप कोतकर याचा जिल्हा बंदी उठवण्यासंबंधीचा अर्ज आज रोजी फेटाळला आहे.
याप्रकरणी फिर्यादी संग्राम कोतकर यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ कायदेतज्ञ उमेशचंद्र यादव-पाटील यांनी काम पाहिले.