मुंबई : सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. या जमान्यात 'रील स्टार्स'ना विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. काही रील स्टार मनोरंजनासोबतच आपल्या रील्समधून विविध समस्यांवर प्रकाश टाकतात, तर काही अन्यायावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.
अशाच 'रील स्टार'वर आधारित सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचं नावही 'रील स्टार' असंच आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या मल्टीस्टारर चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. त्यामुळे आतापासूनच या सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झालं आहे.
जोस अब्राहम, मोनिका कंबाती आणि निशील कंबाती यांनी 'जे फाइव्ह एंटरटेनमेंट्स', 'फोनिक्स ग्रुप' आणि 'इनिशिएटिव्ह फिल्म्स'च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर 'अन्य'फेम सिम्मी आणि रॉबिन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचं नवीन मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांचे भाऊ भूषण मंजुळे 'रील स्टार'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
त्यांच्यासोबतच या चित्रपटात मिलिंद शिंदे, कैलास वाघमारे, उर्मिला जगताप, रुचिरा जाधव, स्वप्नील राजशेखर, शुभांगी लाटकर, विजय पाटकर, अनंत महादेवन, ज्ञानेश वाडेकर, महेश सुभेदार, शिवाजी पाटणे, गणेश रेवडेकर आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. तर कॉस्च्युम डिझायनर राणी वानखेडे आहेत.