पुणे - लोणीकंद वाहतूक विभागांतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याकरिता काही रस्ते आणि चौक या ठिकाणी सर्व प्रकाचे जड, अवजड, डंपर, आरएमसी मिक्सर, जेसीबी., रोड रोलर आदी मंदगती वाहनांना दिवसाच्या निश्चित कालावधीत वाहतूक बंदी आणि पार्किंग करण्यास बंदी करण्यात आली आहे.
त्यानुसार सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना पुणे नगर मार्गावर सकाळी ७ ते ११ आणि सायं. ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक बंदी तसेच पार्कींग करण्यास बंदी करण्यात आली आहे.
वाघेश्वर चौक, वाघोली ते खराडी बायपास, वाघेश्वर चौक, वाघोली ते लोणीकंद, केसनंद मार्गावर वाघोली ते शिवाजी चौक केसनंद गाव, लोहगाव वाघोली मार्गावर लोहगाव चौक, वाघोली ते लोहगाव ते धानोरी मार्गे विश्रांतवाडी या दरम्यान प्रवेश बंदी असणार आहे.
याशिवाय लोहगाव रस्त्यावर लोहगाव पेट्रोलसाठा चौक ते विश्रांतवाडी या मार्गावर तसेच या मुख्य मार्गाला जोडणारे अंतर्गत रस्त्यांवर सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत वाहतूक व पार्किंग बंदी करण्यात आली आहे.
हा आदेश अत्यावश्यक सेवेतील फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, पीएमपीएमएल आदी वाहनांखेरीज अन्य वाहनांसाठी काढण्यात आल्याची माहिती पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.