दि. २ आक्टोबर १९०४ ला जन्मलेले शास्त्रीजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान. साधेपण म्हणजेच लालबहादूरजी.
१९२७ ला झालेल्या त्यांच्या लग्नात सासुरवाडीकडून एक चरखा आणि काही मीटर हाताने विणलेले कापड मिळाले होते आणि यापेक्षा शास्त्रीजींना काहीही नको होते.
१९३० मध्ये झालेल्या दांडीयात्रेनंतर देशभरात झालेल्या क्रांतीने देश पेटून उठला होता. शास्त्रीजींनीही स्वतःला या स्वातंत्र्य संग्रामात झोकून दिले होते. सात वर्षाचा तुरुंगवासही भोगला होता.
स्वातंत्र्यसंग्रामात नम्र विनित असलेल्या शास्त्रीजींचे महत्व नेत्यांच्या लक्षात आले होते. त्यांच्या कठोर मेहनत करण्याच्या क्षमतेमुळे त्यांनी १९५१ पासून केन्द्रात रेल्वे, वाहतूक, वाणिज्य, उद्योग, गृहमंत्री ही पदे सांभाळली. तसेच नेहरुंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले.
ते रेल्वेमंत्री असताना रेल्वे अपघात झाला. खरंतर यात शास्त्रीजींची काहीच चूक नसताना त्यांनी त्या अपघाताची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिला. यासाठी तत्कालीन पंतप्रधान नेहरुंनी शास्त्रीजींच्या आदर्श मुल्यांची आणि इमानदार वृत्तीची प्रशंसा केली होती.
सन १९५२, १९५७ व १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या यशात शास्त्रीजींचे मोठे योगदान होते. महात्मा गांधीजींचा पगडा असलेले शास्त्रीजी 'कठोर मेहनत ही प्रार्थनेसमान' ही गांधीजींची शिकवण कायम राखणारे शास्त्रीजी कोमल वाटत असले तरी कर्तव्यकठोर होते.
ब्रिटिश राजवटीच्या विरोधात स्थापलेल्या अनेक विद्यापीठापैकी एक काशी विद्यापीठ. त्यात ते सामील झालेले. काशी विद्यापीठाने त्यांना दिलेल्या पदवीचे नाव 'शास्त्री' होते. लोकांच्या मनात मात्र त्यांच्या नावाचा भाग म्हणून शास्त्री हे नाव कोरले गेले आहे.
शास्त्रीजींनी तीसहून आधिक वर्ष देशसेवेसाठी समर्पित केली आहेत. त्यांच्या काळात १९६५ ला भारत - पाकिस्तानचे दुसरे युध्द झाले.
सोव्हिएट संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युध्दबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हिएट संघ.. वर्तमान - उझबेकिस्तान) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी १९६६ ला शास्त्रीजींचे अचानक निधन झाले.
अनवाणी शाळेला जाणारा गरीब कुंटुबातील नन्हे ते पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी हा प्रवास अचंबित करणारा आहे. आदर्श जीवन जगणारे, अत्यंत लोकप्रिय दृढ आंतरिक शक्ती असलेले आपले पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांना विनम्र वंदन.
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)