'खंडेनवमी'ला विविध शस्त्रे, अवजारे, साधनांची पूजा करण्याचा दिवस. या पूजेला सैद्धांतिक आणि व्यावहारिक असे दोन पैलू आहेत. आपले सण हे कृतज्ञतेने साजरे करत असतो. बैल, वनस्पती वगैरेंचे उपकार आठवून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.
त्याच पध्दतीने निर्जिव असणाऱ्या पण आपल्याला उपयोगी असणाऱ्या आणि आपले जीवन अधिक सुखमय करणाऱ्या वस्तू विषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांची पूजा करणे हे उमदेपणाचे आहे.
पण या पूजेचे स्वरूप नवस, कर्मकांड इत्यादी प्रकारचे असता कामा नये, याची दक्षता घ्यायला हवी. व्यावहारिक दृष्टीने पहाता आपण जी साधने सातत्याने वापरत असतो, त्या वस्तू चांगल्या अवस्थेत आहेत की नाही, याची तपासणी करून त्यांची स्वच्छता करणे.
म्हणजे गरज पडेल तेव्हा विनासायास वापरता यावीत.. अशा अवस्थेत सज्ज ठेवणे, हाही या पूजेमागचा हेतू असतो. भारतीय प्रत्येक सणांच्या माध्यमातून व्यक्ती, प्राणी, वस्तू, निसर्ग यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत असतो.
आज शस्त्रपूजा करावी का.? आजची शस्त्र कुठली हवीत.? याचा विचार प्रत्येक सुजाण मनाने करायला हवा. सणानिमित्त होणारी वनस्पती, झाडांची तोड खरच आवश्यक आहे का.?
हल्ली प्रत्येक सणांचा इव्हेंट होत आहे. बीभत्स गाणी, नृत्य हे सारं पटण्याच्या पलिकडे आहे. काही संघटना, मुले अतिशय विधायक कार्यक्रम करत असतात. त्यांचे काम समाजासमोर यायला हवी.
तुमच्या विचारांची शस्त्र तुम्ही सतत विज्ञान आणि विवेक यावर पारखून घेण्याची गरज आहे. बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्याची गरज आज अधोरेखित झाली आहे. चुकीचे घडेल तिथे मत व्यक्त करण्याचा निस्पृहपणा प्रत्येकात असतोच त्याला धार लावणे, जपणं हे आपलं काम आहे.
'मला काय त्याचे' हा पळपुटेपणा नकोच. विचारांच्या शस्त्रांची निगा तुमच्याकडून सतत व्हावी.. आणि वेळीच व्यक्त व्हायचं धारिष्ट्य तुम्हाआम्हाला प्राप्त व्हावे हीच निसर्ग चरणी प्रार्थना.
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)