आश्विन शुद्ध त्रयोदशीस धनत्रयोदशी म्हणतात. मनुष्याला आनंदाने उपजिविका करण्यासाठी धनाची आवश्यकता असते. हे महत्त्वाचे साधन आहे, कष्ट करून योग्य मार्गाने मिळवलेले धन हे माणसाला सुरक्षितता, स्वावलंबन आणि आनंद देणारे असते.
अशा धनाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हा धनत्रयोदशीचा अभिप्रेत अर्थ आहे. या दिवसाचे दुसरे महत्व म्हणजे वैदिक परंपरेत दक्षिण दिशा अशुभ मानण्यात आली आहे. यामागे एक सांस्कृतिक इतिहास आहे.
वैदिक लोक आणि विरोध करणारे बळी वगैरेचे अनुयायी दक्षिणेकडे सरकले होते. ते यज्ञयागाला विरोध करणारे होते. युध्दे होत तेव्हा ते दक्षिणेकडून हल्ला करत. वैदिकांना या हल्ल्याची भिती वाटत असे. ते भितीपोटी दक्षिण दिशेला अशुभ मानू लागले. आणि दक्षिण दिशेला दिव्याचे तोंड करून दिवा सुध्दा लावत नसत.
आणखीन एक दक्षिण दिशा मृत्यू देवता
यम यांची ही दिशा आहे, असेही मानतात. म्हणून अल्प वयात मृत्यू येऊ नये आणि दक्षिण दिशेला राहणाऱ्या अवैदिक लोकांचा गौरव करावा म्हणून आज दक्षिण दिशेला तोंड करून कणकेचा दिवा लावतात.
या दिवसाचे तिसरे महत्व म्हणजे आयुर्वेदाचा प्रवर्तक, धन्वंतरी याचा जन्म दिन. धन्वंतरी हा आयुर्वेदाचा जनक, याच्या एका हातात अमृत कलश, दुसऱ्या हातात जळू, तिसऱ्या हातात शंख, चौथ्या हातात चक्र अशी प्रतिमा प्रत्येक दवाखान्यात तुम्हाला दिसेल. या आयुधांनी धन्वंतरी उपचार करतात असे म्हणतात.
धन्वंतरी प्रसाद म्हणून कडुनिंबाची पानांचे बारीक तुकडे आणि खडीसाखर वाटली जाते, कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे, असे समजतात. कडुनिंबाचे उपयुक्तता पाहिली तर हे खरं आहे.
कडुनिंबाची रोज चारपाच पाने खाल्ली तर आपण निरोगी राहू हे खरं. धनत्रयोदशी दिवस आर्थिक, मानसिक, शारीरिक आरोग्य सांभाळण्यासाठी रेखलेला दिवस आहे, असे मला स्वतःला वाटते.
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)
(भारतीय सण, पर्यावरण, पदार्थ या पुस्तकातून साभार)