पूर्वजांची शेतीनिष्ठा आणि संशोधन पध्दती. आता तुम्ही म्हणाल हे काय सांगते स्वप्नजाजिजी वेगळचं.. मुलींनो सणसमारंभ या मागची विज्ञाननिष्ठता आता नव्या पिढीने तरी जाणून घ्यायला हवी असे वाटते.
सेलिब्रेशनच्या नादात आपल्या मुळांकडे आपलं दुर्लक्ष होत चाललय. नव्याच्या पोर्णिमेला नवीन आलेल्या धान्याची पूजा होत असे. शेजारी, नातेवाईकांच्यात या नवधान्याची देवाणघेवाण होत असे.
या देवाणघेवाण पद्धतीमधून पूर्वी या बियाणांचे आदानप्रदान होऊन त्यांचे संरक्षण आणि संवर्धन होत असे. दसरा हा सण जरी विजयादशमी म्हणून ओळखला जात असला तरी, तो ‘बीजोत्सव’ आहे.
नवरात्रीच्या घटस्थापनेत मोठय़ा पानांच्या पत्रावळीवर त्यावर शेतामधील चार कोपऱ्यांची माती बियाणे मिसळून ठेवली जाते. मध्यभागी पाणी असलेला घट असतो. घरामधील स्त्री मागील हंगामामधील मडक्यात साठवलेले विविध बियाणे मातीत टाकते. घटाच्या सूक्ष्म छिद्रांमधून पाणी झिरपून त्या सर्व बियाणांची उगवण क्षमता दसऱ्याच्या दिवशी तपासली जाते आणि उत्कृष्ट तेच बियाणे शेतात पेरले जाते. पारंपरिक बियाणांची उगवण शक्ती आणि घटामधील पाणी त्या बियाणांची पाण्याची गरज दर्शविते, हेच ते विज्ञान.
'गरबा' हा शब्द गर्भ या शब्दापासून उत्पन्न झाला आहे. मातीच्या देहात नऊ महिने लढणारा हा जीव. याचे प्रतिक म्हणून मातीच्या घटात नऊ दिवस हा प्राणदिवा अखंड पेटता ठेवला जातो, बीजोरोपणाचा शोध निर्ऋतीने लावला.
ती बियाणे क्षत होऊन त्याला कोंब फुटतात. बघा हेही स्त्रीच्या अक्षत असण्यापासून मातृत्व मिळविण्यापर्यंतरचे प्रतिक आहे. मग वर आलेले धान्याचे तुरे शेवटच्या दिवशी टोपीवर अडकवून गावाच्या वेशीवर सर्व लोक जमत.
यातून कुणाचे बियाणे चांगले, त्याला पाणी कितपत मिळाले हे नित्कर्ष काढतात. मग सर्व़जण मिळून शेतात कुठलं धान्य पेरायचं हे ठरवतात.
अर्थातच स्त्रीला सृष्टीने दिलेल्या निर्मिती क्षमतेच्यासमोर नतमस्तक होण्याचा सण म्हणजे नवरात्री. देवी दुर्गेने नऊ दिवस महिषासूरांशी युध्द करुन नवमीच्या रात्री त्याचा संहार केला. ती महिषासुर मर्दिनी ठरली. रामाचा कालखंड सुरु झाल्यावर स्त्रीसत्ताक पध्दती संपली. असा बिजोत्सवाचा सण पाहूया जरा वेगळ्या नजरेने..
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)