आज मी बातम्या पहात होते. मल्हारबाबा माझ्या शेजारीच होते.. कुठल्या तरी देवस्थानची सफर होती... माणसे दानपेटीत पैसे टाकत होती. मल्हारबाबा ते लक्षपूर्वक पहात असावेत. 'मां लोक देवबाप्पा कडे का जातात.?'
'देवबाप्पाचे दर्शन घ्यायला.!'
"दर्शन ??"
"अरे पिलु पहायला, भेटायला जातात."
"अले मग बाप्पा पैशे कशाला घेतो, तो काय कलतो बॉक्स भलूनच्या पैश्याचे.?" चार वर्षाच्या त्या बोबड्या बोलातून खूप सारे प्रश्न डोक्यात येऊ लागले.
खरंतर असे प्रश्न मोठ्यांना का पडत नसावेत.? इतक्या साऱ्या पैशांचा विनियोग सगळीकडे योग्य मार्गाने होत असेल.? श्रध्दा आणि अंधश्रध्दा यात अत्यंत धूसर रेखा आहे. ही धुसर रेषा आपण सुजन आहात. आपल्या लक्षात येईलच.
कोणाला चमत्कार करणारा श्रीकृष्ण आपला वाटेल. पण मला श्रीकृष्ण म्हणजे धुरंधर राजकारणी, मुसद्दी आणि स्त्री समतेचा पुरस्कर्ता. राधेचा सखा असलेला कृष्ण माझा वाटतो. मी त्याची पूजाअर्चा करण्यापेक्षा त्याचे विचार आचरणात आनंद वाटतो. ही माझी श्रध्दा आहे.
पती वारल्यानंतर पत्नीने केशववपन करावे, ही अंधश्रध्दा पुरुषी बिभत्स कामुकतेला आळा घालण्यासाठी भलेही असेल.. पण ती चुकीचीच.! धर्म, देव हा जर माणसासांठी असेल तर विज्ञान आणि व्यवहाराच्या कसोटीवर तो खराच उतरला पाहिजे.
दान सत्पात्री असावं, असं लहानपणापासूनच ऐकतो. हे दानपेटीतील दान सत्पात्री जात असेल.. कारण भ्रष्टाचाराच्या दानवाने तिथेही शिरकांव केला आहे. माणसामाणसातले प्रेम, आदर वाढवणारा तो माझा धर्म, असं सर्वांनीच ठरवलं तर बाप्पाला पैसे द्यावे लागणार नाहीत.
टाकतो मी देवासमोर एक नाणे
गातो माझे गाऱ्हाणे
मागतो लाखोंचे मागणे
ही भक्ती की भक्तीचे बहाणे.!
आणि बाप्पा पैश्याचे काय करतो, असे प्रश्न पुढच्या पिढीला पडणारही नाहीत. स्वार्थापोटी आपण देवालालाच द्यायचं धाडस करतोय, ते आवडेल का देवाला.? ह्याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कुठं थांबायचं, ते आता आपल्याला कळायला हवंच.!
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)