आयुष्यभर अहिंसेचे पुरस्कर्ते, विज्ञानाची अध्यात्माशी निरंतर जोड देणारे मनुष्यजातीच्या उध्दारासाठी समतेची शिकवण देणारे भूदान चळवळीचे प्रणेते आदरणीय विनोबा भावे यांची जयंती नुकतीच साजरी झाली.
मी चार वर्षापूर्वी याच दिवसात अहमदाबादला गेले होते तर साबरमती आश्रमात विनोबाजींची निवासाची खोली पाहिली इतकी लहान, कसाबसा एकटा माणूस राहिल तिथं.. अशी इतकं सारं तत्त्वज्ञान या खोलीत बसून लिहलं..
मन भरुन आलं. वाटलं, या भिंती बोलल्या असत्या तर बापूंच्या, विनोबाजींच्या विचारकथा त्यांनीच सांगितल्या असत्या. विनोबाजींची तेव्हापासूनच शिक्षणपध्दती बद्दल काही ठाम मतं होती.
शिक्षण हे कर्तव्यकर्माचे आनुषंगिक फळ आहे. जो तो कर्तव्य करतो, त्याला ते कळत नकळत मिळतं.. लहान मुलांनाही ते मिळायला हवं.. त्यांच्या भोवती असे वातावरण उभे करायला हवे जेणेकरुन ती स्वावलंबी होतील. अशा योजना शिक्षणपध्दतीत असायला हव्यात.
'जीवन हे मुख्य केंद्र जाणून त्यांच्या आसपास जरुरी प्रमाणे सर्व शिक्षण उभे केले पाहिजे.' किती महत्त्वाचे बोलले होते.. आजच्या शिक्षणपध्दतीलाही हे लागू होते. त्याचं एक 'मधुकर' नावाचं पुस्तक आहे. त्यात ते म्हणतात.
'समोरच्याचा एक मोहरीएवढा सद्गुण आपण आकाशाएवढा करुन पाहिला पाहिजे.. आपला मोहरीएवढा दोष घालविण्यासाठी तो सतत लक्षात ठेवायला हवा.' कदाचित विनोबाजींचे विचार अतिआदर्शवादी वाटतील ते व्यवहार्य वाटणारही नाहीत..
पण विनोबाजींच्या विचारांतील शुभदृष्टी व्यवहार्यता आणि त्यां विचारांचे महत्त्व माझ्या मनावर अधोरेखित झाले आहे. आपण सद्गुणांचे पुतळे नसतोच.. कारण रोज व्यंकटेश स्तोस्र म्हणताना आपण कबूलही करत असतो.
"माझ्या अपराधांच्या राशी भेदून गेल्या गगनाशी". म्हणून दुसऱ्यांचे गुण आभाळाएवढे करुन पहायची गरज आहे. माणूस आपल्या मर्यादित शक्तिनुसार तो आपल्या धर्माचे पालन करत असतो. पण त्याने दुसऱ्यांच्या धर्माचाही आदर करणं शिकायलाच हवं.
शिक्षकांना लहान मुलांच्या अज्ञानाशी लढायचं असतं. अज्ञानाशी लढायचं असेल तर जशास तसे या न्यायाने उत्तर द्यायला यायला हवं.. हे उदाहरण मला नवी दृष्टी देऊन गेलं.
जशास तसे याचा अर्थ असा घ्यावा, समोरच्याची तलवार भलेही धारदार, दुधारी असो.. पण त्यावेळी तलवारीचा घाव सहन करणारी ढाल तेवढीच मजबूत हवी.. तेवढीच ताकतवर हवी.. कित्ती खरंय हे.!
आपल्यासमोर आयुष्य जगताना नवी नवी आव्हाने उभी असतात. पण या काळाच्या तलवारीसमोर आपली ढाल मजबूत हवी. त्यासाठीच आपलं ज्ञान सखोल हवं.
असत्याशी सत्याने लढावं..
रागाशी संयमाने लढावं...
द्वेषाशी प्रेमानं लढावं..
खोट्या माणसाबरोबर,
खरं वागून जिंकावं...
विनोबाजींनी मला ही दृष्टी आणि संस्कार दिल्याबद्दल विनोबाजींना जयंतीनिमित्त विनम्र वंदन..!
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)