गौरी-गणपतीच्या सणाचा हा अर्थ माझ्या मनाला भावून गेला. खरंच अंधश्रद्धा न ठेवता.. सश्रद्ध मनाने पूजन व्हावे. पहा बरे तुम्हाला देखील हे पटते का..
तसं म्हटलं तर आपल्या या सर्व सणांचा मूळ उद्देश स्वतः आनंद घेणे आणि दुसऱ्याला आनंद देणे हाच नाही का.? हातून काहीतरी देणे व्हावे म्हणून हे सोपस्कार असावेत... चालत आलेली रीत म्हणून तसेच आई-सासू सांगते म्हणून केले जाणारे सणांचे सोपस्कार. असं का.? कशासाठी.?
आदिमानवाच्या काळात माणूस आपल्या उपजीविकेसाठी सतत भटकत होता. शिकार मिळेल तिथे धावत होता. त्यात जसे पुरुष होते तशा स्त्रिया पण होत्या. पण असं धावतांना स्त्रीची दमछाक होत होती. म्हणून एकाठिकाणी राहण्याचा प्रयत्न करू लागली.
त्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधू लागला. त्यातूनच स्त्रिला शेतीचा शोध लागला आणि या शेतीमुळेच स्त्रिया जीवनातील स्थैर्य आले. तिने आपल्याबरोबर पुरुषांनाही थांबवले. त्यातूनच तिने कुटुंब या संस्थेची निर्मिती केली.
या कुटुंब संस्थेची निर्माती स्त्री आणि तिचा गौरव म्हणून हे गौरीपूजन. जेव्हा आणि कनिष्ठ गौरीचे म्हणजे बहिणी बहिणीचे पूजन करतो, त्यावेळी कथा पण सांगितली जाते. ती अशी (अर्थात प्रत्येक ठिकाणी या कथेत थोडा फार फरक असेल कारण त्यात मौखिकता जास्ती आहे.)
गणपती मावशीच्या घरी येतो. त्याला घेऊन जाण्यासाठी त्यांची आई म्हणजे गौरी (पार्वती) येते. आधीच श्रावणात बसलेली गौर म्हणजे तिची बहिण ओवाळून स्वागत करते. तिला आपलं घर फिरवून दाखवते. ‘गौर आली, गंगा आली, कशाच्या पावलाने आली? सोन्या मोत्याच्या पावलांनी आली असे म्हणत फिरवते.
(अतिथी देवो भव:) नंतर आई–मावशी जवळ (गणोबा ) गणपतीचा बसवतो. दुसरे दिवशी गणपतीचे वडील शंकरोबा येतो. त्याचे जावाई म्हणून नटवून- सजवून कौतुक केले जाते. प्रथम भाकरी- भाजी नंतर पुरणपोळी अनेक फराळाचे पदार्थ, मोदक असे अनेक पदार्थ खायला घालून त्यांचा पाहुणचार केला जातो.
शेवटच्या दिवशी पाठवडी, शेंगोळे आणि दहीभाताची (थंडावा) शिदोरी बरोबर देवून पाठवली केली जाते. गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशी उदासीनता व्यक्त होते. तसेच गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असं आश्वासन ही घेतलं जातं.
हे सर्व पाहताना एक जाणवले.. बहिणी-बहिणी, आई-मुलगा, पती-पत्नी, मावशी-भाच्या तसेच वडील मुलगा या सर्व नात्याचा केलेला गौरव नाही का.? असंही सांगितलं जातं की जेव्हा लक्ष्मीला माहेरपणाचं सुख अनुभवासं वाटतं तेव्हा ती गौर म्हणून येते. म्हणून लेकीला म्हणजेच माहेरवाशीणीला महत्व.
म्हणजेच जी कुटुंबसंस्था निर्माण केली गेली त्याचा गौरव म्हणून हे सण आणि त्याचे संस्कार विधी. पूर्वीच्या काळी मुलीची लग्ने लहान वयात होत. तसा म्हटलं तर त्यांच ते नाचण्या बागडण्याचं वय. म्हणूनच मग गौरीचं खेळ आले.
गौरीच्या गीतांतून खेळातून या संस्कृतीचा वसा मौखिक माध्यमातून जुनी पिढी नव्या पिढीकडे सोपवू लागली. या गीत रचनेमुळे आणि पाठांतरामुळे स्त्रीच्या बुद्धीला धार लावली जाई.
खेळामुळे आरोग्याची तर काळजी घेतली जाई. भावी पिढी सुधृढ सशक्त व्हावी तनाने आणि मनाने देखील हा यातील मूळ उद्देश असावा. कारण हि मुलगीच पुढे माता होणार असते..
गौरीची झाडे, शंकर या प्रतीकांची योजना कशासाठी तर त्याचं ही उत्तर असं मिळालं, पूर्वीच्या काळी शेतात गौरीची झाडे, गावात (दुर्वा ) या दिवसात प्रचंड प्रमाणात उगवत, मग ती काढल्याशिवाय इतर पिकांना रान मोकळं होतं नव्हतं म्हणून अशा रीतिने रिकामं केलं जायचं.
म्हणजेच कालानुरूप प्रथेमध्ये बदल करणे हि गोष्ट दैवी संकेताप्रमाणे आपल्या पूर्वजांनी केली. आपण मात्र पत्री वाहण्यासाठी झाडे झुडपे तोडतोय.. निसर्गाला ओरबाडून घेतोय. थांबवूया आता हे सगळे..
श्रीगणेशाची मूर्ती मातीपासून बनवली जाते कारण आपल्याला जाणीव व्हावी की आपले शरीरही मातीचे बनले आहे. या मातीतच मिसळून जाणार आहे. त्यामुळे सतत आत्मजाणीव जागी रहावी. म्हणजे चुकूनही चुकीचे वर्तन हातून घडणार नाही आणि मातीमुळे पर्यावरणावर देखील वाईट परिणाम होणार नाही.
तेव्हा मूर्तीवर रंगकाम देखील नसायचे, याचे कारण निसर्ग प्रदूषण मुक्त ठेवणे हेच होते. श्री गणेशाकडे, गौरीकडे काहीही न मागता त्यांचे हुशारी, दया, क्षमा, शांती, सत्य, पावित्र्य, असे अनेक गुण अंगी धारण करायचा प्रयत्न करूया. हा खऱ्या अर्थी श्री गणेशाचा उत्सव असेल.. असे मला वाटते तुम्हाला काय वाटते.?
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)