काही दिवसांपूर्वी आपल्या शेजारील पुणे येथे धुवांधार पाऊस पडला. शहरातील अनेक भाग जलमय झाले. जनतेचे प्रचंड हाल झाले. नुकसान झालं. दोन वर्षांपूर्वी सांगली, कोल्हापूरला जो पाऊस झाला. २०, २५ फूट पाणी शहरात होते. तेथे झालेल्या नुकसानीची आठवण झाली तर अंगावर काटा येतो.
प्रशासनाने त्यापूर्वी केलेले दुर्लक्ष, अतिक्रमणे, आदी आनेक बाबी चव्हाट्यावर आल्या. पणं वेळ निघून गेली होती. शेकडो नागरिकांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं. हा निसर्ग आहे, पाऊस कधी कोणत्या शहरात हाहाकार माजवेल... सांगता येतं नाही.
असा पाऊस जर आपल्या नगर शहरात बरसला तर..? आपल्या शहरात पूर्वीपासून अनेक ओढे झुळझुळ वाहत होते. ओढ्यांमुळे पावसाचे पाणी वहात नदीला जाऊन मिळतं असे... त्यामूळे कधी पावसाचा धोका वाटला नाही.
पण आता तर काही राजकीय म्होरक्यांनी पैश्याच्या आमिषाने प्रशासनाशी, शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी आर्थिक संगनमत करून या नैसर्गिक ओढे, नाल्यांचा घोट घेतला. अन् या शहरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण केला आहे.
हे वास्तव आहे. अन् शहराशी बेइमानी करणाऱ्या या राजकीय म्होरक्यांच्या व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या या बेइमानी विरोधात एक वयोवृद्ध महात्मा लढतो आहे. तो म्हणजे आदरणीय शशिकांत चंगेडे.
गेली अनेक वर्ष ते याविरोधात शहराच्या न्यायासाठी लढत आहेत, आणि आमचं शहर मात्र मुकेपणाने याकडे पहात आहे.. मरणासन्न अवस्थेत गेलेल्या या शहरातील लोकांकडून तरी काय अपेक्षा करणार..?
आम्हाला अशा काही विषयांवर पावसात भिजत चर्चा करायला खूपच आवडत असतं. आता तर फार नेते आमदारकीच्या रिंगणात आहेत. चर्चा चालू आहे. विकासाचं स्वप्न आहे. त्यांचा की शहराचा.? हे कळायला मार्ग नाही.
ओढे बुजले, प्लॉट पाडले, नदी बुजवली, कठडे पाडले, जनता मात्र खाली मान घालून जगते आहे. कोणी ठेकेदार, कोण दलाल, सगळ्यांना आता लढायच आहे. पावसात भिजत सिध्दीबागेच्या रस्त्यावर तीन फूट पाण्यात, एकदा तरी आमदार व्हायचं आहे एकदा तरी आमदार व्हायचं आहे..!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)