तरीही म्हणे 'ती' स्वतंत्र असते..!
शिकली तर कमवण्याचं स्वातंत्र्य नाही,
कमविले तर खर्चायचं स्वातंत्र्य नाही,
तरीही ती म्हणे स्वतंत्र आहे..!
घरची सत्ता वाचवायला निवडणुकीला उभी रहाते,
निवडून आल्यावर नवरा म्हणेल तिथं सहीचा अंगठा उमटवते..
पक्षधोरणं नाही आवडलं तिला
तर तिला कोण विचारते..?
तरीही ती म्हणे स्वतंत्र आहे..!
नवरा म्हणेल त्या चित्राला मत द्यायचे असते,
चित्रातल्या उमेदवाराबद्दल काहीही बोलायचे नसते..
तरीही ती म्हणे स्वतंत्र आहे..!
विरोधी पक्षाच्या बाकावर सासुबाईंचे अढळपद आहे,
त्यांच्या मदतीला अपक्ष नेत्या नणंद उभी आहे..
तरीही ती म्हणे स्वतंत्र आहे..!
हुंडाबळी म्हणून अजूनही जळते आहे..
विधवा, बलात्कारिता, अपमानाचे घाव सोसते आहे..
बायको म्हणून ती दुर्बल आहे,
आई वृध्दाश्रमाची वाट चालते आहे..
आणि तरीही म्हणे ती स्वतंत्र आहे..!!
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)
(स्त्रीस्पंदन या कवितासंग्रहातून)