पहिलीच्या पुस्तकात एक बडबडगीत समाविष्ट करण्यात आले आहे. ते ना बडबडगीत आहे ना कविता. मराठीवर हिंदी, इंग्रजी शब्द स्वार झाले आहेत.
हा मराठीचा अपमान आहे, हे कविता पाठ्यपुस्तकात निवड करणाऱ्या समितीला कळू नये हे समाजाचे दुर्देव आहे. यावरून निवड समितीचा 'स्तर' लक्षात येतो. की अशा वशिल्याच्या तट्टूवर मेहेरबान व्हायची पध्दत राजमान्य झाली आहे.
वाचन वाढलं पाहिजे, त्यामुळेच आपला शब्दसंग्रह वाढतो. मराठी अत्यंत समृद्ध भाषा आहे. प्रत्येक शब्दांना अनेक अर्थ असतात. प्रत्येक शब्द वाच्यार्थाने, लक्षणार्थाने, भावार्थाने, गर्भितार्थाने असा वेगवेगळ्या पध्दतीने वापरला जातो, हे हल्ली नवलेखकांच्या लक्षात येत नाही.
याला कारण भाषेचा, अभ्यासाचा स्तर किती खाली आला आहे, याचे द्योतक आहे. अशा सुमार बुध्दीच्या लोकांच्या कविता निवडीमागे निवड समितीचा स्तर मात्र पार लयाला गेला आहे, हे मात्र खरं.
खरंतर बालगीत, बडबडगीत लिहिताना शैशवाशी मैत्र असावं लागतं. गदिमांच्या नाच रे मोरा सारखे बालगीत आणि त्यासारख्या बालगीतांची गोडी अजूनही लक्षात आहेत. शिशुवर्गात शिकलेली बालगीत मोठं झाल्यावर लक्षात रहातात याचाच अर्थ ती नदीसारखी प्रवाही आहेत.
लहान असताना एक निबंध लिहायचा असेल तर बाबा त्या विषयावरील दहा पुस्तके वाचली पाहिजेत असं सांगत, वाचायला लावत. हल्ली राज्यकर्त्यांनी शैक्षणिक क्षेत्राची पार वाट लावली आहे.
कवितेचा स्तर पाहून, निवड समितीच्या बुध्दीचा स्तर आणि निवड समितीत ठराविक विचारांचे लोक भरणा करणाऱ्या राज्यकर्त्यांचा स्तर मात्र विचारात घ्यायची वेळ आली आहे.
मराठी जगली पाहिजे, असे वाटणारे आम्ही, आमच्या परीने निषेध व्यक्त करुच. पण सर्वांनीच बरं बोलण्यापेक्षा खरं बोलावं..! नाही का?
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)