मंथरा : फक्त 'व्यक्ती' नव्हे, तर एक अजरामर 'प्रवृत्ती'


कालच एक कथा वाचली. कंसाचा वध केल्यानंतर जेव्हा श्रीकृष्ण, वसुदेव- देवकीची कारागृहातून सुटका करण्यासाठी आले, तेव्हा देवकी त्यांना म्हणाली, "हे कृष्णा,तू स्वतः साक्षात् परमेश्वराचं रूप आहेस. मग तू तर कधीच कंसाचा वध करू शकत होतास. पण कंसाला मारून आमची त्याच्या कैदेतून सुटका करायला तू चौदा वर्ष का बरं थांबलास.? 

तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ' माते, गेल्या जन्मात तू मला चौदा वर्षे वनवासात का बरं पाठवलं होतंस.?" श्रीकृष्णांचं उत्तर ऐकून देवकीला धक्काच बसला. 'मी ? मी कधी तुला 14 वर्ष वनवासात पाठवलं  होतं.? हे काय बोलतो आहेस तू.? मला तर काहीच आठवत नाही.'

त्यावर कृष्ण भगवान म्हणाले, "माते, ही घटना तुझ्या गतजन्मातली असल्यामुळे तुला आता त्यातलं काहीच आठवत नाही. पण गेल्या जन्मात तू कैकयी होतीस आणि तु मला 14 वर्षांसाठी वनवासात पाठवलं होतंस.'

हे ऐकून देवकीला धक्काच बसला आणि तिने आश्चर्याने विचारलं, 'मी गेल्या जन्मातली कैकयी.. मग त्या जन्मातली कौसल्या कोण..? यावर श्रीकृष्ण हसून वदले, 'माता यशोदा' म्हणजे गेल्या जन्मीची कौसल्या. जिला गेल्या जन्मात, माझी आई असूनही १४ वर्ष पुत्रप्रेमाला पारखं व्हावं लागलं होतं. तिला ते प्रेम, माझी माता म्हणून याजन्मी लाभलं.!"

"माते, प्रत्येकाला आपल्या गतजन्मीच्या कर्मांची फळं भोगावीच लागतात. त्यातून देवांचीही सुटका होत नाही.!" ही कथा वाचली आणि मला 'मंथरा' आठवली. रामायण म्हटलं की रामाची आठवण येते. त्याचबरोबर सगळं रामायण घडवणाऱ्या मंथरेचीही आठवण येतेच.

एक सुखी, संपन्न राजपरिवार ! पितृभक्त पुत्र. प्रेम करणारे भाऊ.. सख्ख्या आई इतकीच माया करणाऱ्या सावत्र आया. नवपरिणित राजपुत्राच्या राज्याभिषेकाचा जवळ आलेला क्षण. ओसंडून वाहणारा आनंद.! अन् त्या आनंदाला गालबोट लावणारी.. त्या सौख्याच्या क्षणांची राखरांगोळी करणारी, त्या भरल्या घराला दृष्ट लावणारी, ती एक मंथरा...!

श्रीरामावर पुत्रवत् प्रेम करणाऱ्या कैकयीच्या कानात असूयेचं, मत्सराचं हलाहल ओतून स्वतः नामानिराळी राहणारी अन् होणारा उत्पात चवीचवीने न्याहाळणारी ही मंथरा.. म्हणजे रामायणाची खलनायिका..!

रामायणाला हजारो वर्ष उलटून गेली तरीही मंथरा मात्र अजूनही जिवंत आहे. मग तिला तिच्या कृष्णकृत्यांचं फळ कसं नाही भोगावं लागलं.? कारण मंथरा ही एक 'व्यक्ती' नसून "मंथरा" ही एक वृत्ती आहे.

जिथे जिथे प्रेम आहे.. मैत्री आहे.. जिवाला जीव देणारी नाती आहेत, तिथे तिथे ही 'मंथरा' देखील हजर असते. भरलेले संसार उधळण्यासाठी, मैत्रीचं फुललेलं अंगण उद्ध्वस्त करण्यासाठी, मायेच्या नात्यांना चूड लावण्यासाठी कायम सज्ज असते..!

तिच्या मनात असतो विषारी मत्सर. तिच्या हृदयात असतो जळता हेवा.. तिच्या काळजात असते धगधगती असूया. जी थंड होणार असते नात्यांची शकलं झालेली पाहून. जी हर्षभरित होणार असते मैत्रीत आलेला दुरावा पाहून आणि जी तृप्त होणार  असते जे जे उदात्त, मंगल असेल.. ते ते नष्ट झालेलं पाहून.

पण ती मात्र नष्ट होत नाही कधीच, ती पुन्हा पुन्हा नव्या रुपात येते एक 'वृत्ती' म्हणून. ती कोणाच्याही मनात जागी होऊ शकते. अगदी आपल्याही. जोपर्यंत या जगात पवित्र भावना आहेत.. निरामय नाती आहेत.. नि:स्वार्थ प्रीती आहे, तोपर्यंत या जगात 'मंथरा' ही असणारच आहे.

सुष्ट प्रवृत्तींसोबत, दुष्ट प्रवृत्तीही नांदणारच आहेत. उदात्त विचारांच्या बरोबर विकृत विचारही जन्मणारच आहेत. जर तिचा नायनाट करायचा असेल, तिला नामोहरम करायचं असेल, आपल्या आयुष्यातून, आपल्या प्रेमाच्या संबंधांमधून.. मैत्रीच्या नात्यांमधून..

जर तिला हद्दपार करायचं असेल.. तर नाती जपताना, मैत्री फुलवताना नि प्रेमसंबंध टिकवताना, विश्वास अन् सदसद्विवेकबुद्धी सदैव जागृत ठेवावी लागेल. तरच आपण या "मंथरेचा" पराभव करू शकू..!

- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !