आषाढ पौर्णिमा म्हणजेच 'व्यास पौर्णिमा' तिलाच आपण 'गुरू पौर्णिमा' म्हणतो. महर्षी व्यास ऋषींनी 'महाभारत' हा महान ग्रंथ लिहिला, पुराणे लिहिली. व्यासऋषी हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात.
ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. म्हणून या व्यास ऋषींची पूजा करण्याचा हा दिवस. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे.
आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, ज्ञान मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण आपले जीवन व्यतीत करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली.
पण आता पूर्वीप्रमाणे गुरू-शिष्य परंपरा राहिली नाही. शाळेतील, कॉलेजातील शिक्षक, संगीत आणि नृत्यासारख्या कलेतील शिक्षक हेच आता 'गुरू'. असे जरी असले तरी प्रत्येकाचा पहिला गुरू त्याची आई असते. तीच त्याला बोलायला, चालायला शिकविते, आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार करते. म्हणूनच म्हणतात 'आई माझा गुरू, आई कल्पतरू'.
'गुरू' या थोर उपाधीला योग्य असे फारच थोडे भेटतात. पण प्रत्येकाकडून काही ना काही शिकत आपण वयाने वाढत असतो. आपण जर शांत बसून विचार केला, कोणाकडून काय शिकलो, हे स्वतःशीच तपासून पाहिले तर असंख्य गोष्टी दिसतील.
अक्षरश: आसपास असलेल्या सहवासात आलेल्या प्रत्येकाकडून आपण कळत नकळत काही बाही शिकत असतो. आई-वडील, बहीण-भावंडे यांच्याकडून तर लहान असताना आपण शिकतोच. पण भेटलेल्या अनेकांकडूनही आपण ठरविले तर शिकू शकतो.
आपला सर्वात किमती दागिना आपल्या चेहऱ्यावरचे निर्व्याज, निरलस हसू असते, हे लहान बाळांकडून शिकू शकतो. निरागस हास्य हा सर्वात मौल्यवान दागिना. एकदा सतत नवे शिकायला हवे असे मनाशी ठरवले तर शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आजूबाजूला दिसतात.
अगदी निसर्गातील प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवण देत असतात. नदी तर मायच असते आपली. साचू नका म्हणून सांगते, वाहते रहा मनातील मळभ काढून वाहत रहा. झाडे - मुळाशी माती घट्ट पकडून ठेवा, मग कितीही वादळे आली तरी उन्मळून पडायची भिती मनाला शिवणार नाही, असा धडा देतात.
जेवढे मातीत पसराल तेवढे वर उंच आकाशात जाल, फुलाल, बहराल असा पुढचा धडा आपली पाने न उलटत नुसत्या अस्तित्वाने सांगत रहातात. जणू कुठल्याही परिस्थितीत आपले पाय मातीचे राहिले पाहिजेत, हेच वृक्षवल्ली आपल्याला शिकवतात.
आकाश - आपण किती नगण्य आहोत त्याचा प्रत्यय चांदण्या रात्री आणून देते. तर समुद्र आपली अमर्याद शक्ती लाटेतून किनाऱ्यावर आदळताना त्या वेगवेगळ्या होतात, तीच आपली मर्यादा आहे, हे आपल्या गाजेतून सुचवत असतो.
पुस्तक आपण निर्जीव वस्तू मानतो. पण पुस्तकातून ही आपल्याला कितीतरी ज्ञान मिळते. अनेक मोठमोठ्या लेखकांचे, नेत्यांचे, यशस्वी उद्योजकांचे, शास्त्रज्ञ यांची आत्मवृत्ते वाचून आपल्याला अनुभव वाचावयास मिळतात.
किती खडतर जीवन पार करत त्यांनी आजचे हे ध्येय साध्य केले, हे सर्व वाचताना आपल्यालाही नवी प्रेरणा मिळते. उर्जा मिळते. अपयशाला पचविण्याची आणि त्यातूनच यशाचा मार्ग साधण्याची.
मी नेहमी म्हणते, त्याप्रमाणे आपण सदैव विद्यार्थी राहणे, हा प्रगतीचा मूलमंत्र आहे. शिकणे थांबले की, विकास होणेही थांबते. मैत्री आपण कशी ठेवू तशी वाढते, बहरते वा मिटत जाते. तसेच काय शिकावे, कसे शिकावे हे बरेचसे स्वतःवरच अवलंबून असते.
निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काहीतरी शिकवत असतो. तशी नजर आपण तयार करायला हवी. तसे झाले तर एकच एक गुरू असे न होता निसर्गाचा प्रत्येक घटक हा आपला गुरूच आहे हे सर्वार्थाने पटेल.
'गुरुमित्र: गुरू सर्वत्र:' म्हणून निसर्गाचा आदर केला पाहिजे. होय ना मंडळी.!सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचे - आपल्या संपूर्ण स्त्री जातीला अज्ञान अंधकारातून ज्ञान ज्योतीकडे नेणारे आपले गुरू माय सावित्रीआई, तात जोतिबा यांना त्रिवार वंदन.
आईबाबांनी प्रत्येक गोष्टीकडे डोळस दृष्टी आणि माणूस म्हणून पहाण्याची नजर तयार केली, आयुष्यात अनेक गुरू आले, सगळ्यात परिस्थितीत पाय मातीचे ठेवण्यात यश आले त्यामुळे त्या वेळेला धन्यवाद आणि सर्वांना नम्र वंदन. प्रत्येक शिक्षकाजवळ एक काळा आणि एक पांढरा असे दोनच रंग असतात. पण साऱ्यांच्या जीवनात रंग भरण्याची ताकद शिक्षकांकडे असते.
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)