अहमदनगर - धनादेश न वटल्याने आरोपी तुषार लक्ष्मणदास मिरजकर यास तीन वर्षांचा कारावास, ५ लाख २५ हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास २० दिवसांच्या अतिरिक्त कारवासाची शिक्षा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आय. एम. नाईकवाडी यांनी सुनावली.
याप्रकरणी एका प्राथमिक शिक्षकाने खटला दाखल केला होता. ते जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मिरजकर यांचा फ्लॅट ७ लाखांना विकत घेतला होता. खरेदीच्या वेळी तक्रारदार यांनी आरोपीस ५ लाख ५० हजार रुपये दिले होते.
हा व्यवहार झाल्यानंतर मिरजकर याने त्याचा फ्लॅट विकण्याचे रद्द करत तक्रारदार यांना ४ लाख ५० हजारांचा धनादेश दिला होता. मात्र तो वटला नाही. फिर्यादीच्या वतीने ॲड. सचिन घावटे व कृष्णा शेंडगे यांनी काम पाहिले.
या खटल्यात ॲड. घावटे व शेंडगे यांनी सादर केलेले साक्षीपुरावे, तसेच युक्तिवाद ग्राह्य धरुन कोर्टाने आरोपी मिरजकर याला वरील शिक्षा सुनावली आहे.