मुलींनाही आहे स्वप्नं पहायचा अधिकार..!


स्वातंत्र्य हा एक स्वतंत्र अधिकार आहे, एक स्वतंत्र शब्द आहे. 'तुला स्वातंत्र्य दिले हे' वाक्य मला नेहमी टोचत आले आहे.  अरे स्वातंत्र्य त्याच्या जागी असतेच.. ते प्रत्येक स्त्रीला ते संविधानाने दिलेले आहेच.


परवा माझी एक मैत्रीण आली होती. मुलगी लग्न करायला तयार नाही.. लोक मला सतत विचारतात. हिला एवढं शिकवलं, स्वतःच्या पायावर उभे केले.. पण हिला आमच्या प्रतिष्ठेचे काही नाही..! मला या सारख्या अनेक मुलींचे पालक ही तक्रार करताना दिसतात.

हल्ली मुली लग्न नको किंवा केले तरी मुलं नको, या निर्णयांवर आलेल्या आहेत. अभिनेत्री अमृता सुभाषने तर स्पष्ट सांगितले आहे, की मला करिअरमध्ये फोकस करायचा आहे, म्हणून मी मातृत्वाची जबाबदारी घेणार नाही.

म्हणजे मुलींना मातृत्व ही जबाबदारी वाटते आहे आणि हे अगदी खरं आहे. यात फक्त मुलींना दोष देऊन आपली जबाबदारी संपते का ? आताच दहावी, बारावीचे निकाल लागले त्यात मुलींनी आघाडी घेतली आहे.

दरवर्षी मुली टॉपर असतात पण त्यातल्या किती आयुष्यात  टॉपवर जाऊ शकतात. करिअरचा त्याग करताना त्यांनी आपली स्वप्ने, इच्छा, आकांक्षा यांचाही त्याग केलेला असतो. त्याच फ्रस्ट्रेशन आयुष्यभर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून डोकावत असते.

मी काय करु शकले असते अन् मला काय करायला लागते आहे..? अशा विचित्र कश्मकशमध्ये मुली अडकतात. अर्थात सासर, माहेरच्या लोकांनी जरा मदतीचा हात दिला तर या समस्येतून सुटका होऊ शकते.

पूर्वी आई होण्यासाठी विवाहित असणं गरजेचं होतं. कारण मातृत्वासाठी विवाहाचा सामाजिक आणि कायदेशीर पाया महत्त्वाचा आहे. अर्थात देशानुरुप यात फरक आहेच. एखादी स्त्री आई झाली की ती कशी झाली याकडे पाहिले जाते.

सिमॉन द बोव्हर या लेखिकेने साधारण पंचाहत्तर वर्षांपूर्वी स्त्रीकडे माणूस म्हणून पहायची गरज अधोरेखित केली होती. "स्त्री जन्मतः तशी नसते तिला तशी घडवली जाते, मातृत्व तिच्या ठायी असतेच हे समाजाने तिच्या डोक्यात भरवले आहे, त्यामुळे मातृत्वाशिवाय स्त्री जीवनाला पूर्तता येत नाही अशी भावना स्त्रीच्या मनात बळावते."

सिमॉन पुढे म्हणते, 'आई होणं ही खरंतर स्त्रीची निवड असायला हवी. पण समाजाच्या प्रभावामुळे स्त्रीसुध्दा आई होणं म्हणजे जीवनाचे इतिकर्तव्य असे मानू लागते, स्त्री जोपर्यंत हे नाकारत नाहीत तोपर्यंत स्त्री खऱ्या अर्थाने स्वतंत्र नाही...!'

आज पंचाहत्तर वर्षांनंतर सिमॉनच्या म्हणण्याप्रमाणे स्त्री मातृत्व नाकारु लागली आहे. या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की, आईपण निभावण्याची जबाबदारी फक्त स्त्रीचीच आहे.

मुलांची काळजी घेणे, त्यांच्या विकासासाठी वेळ देणं त्याचं आरोग्य कसं सुरक्षित राहील याकडे लक्ष देणे, ही काम फक्त आणि फक्त स्त्रीचीच. याकडे आता प्रश्न म्हणून पहायची गरज अधोरेखित होते आहे.

पूर्वी समाजामध्ये स्त्री म्हणजे उत्पादनाचे साधन म्हणूनच पाहिली जायची. त्या व्यतिरिक्त घरकाम, वडिलधाऱ्यांची काळजी हे सारं तिनेच करावं हे गृहीत धरले जायचे. आताही काळ बदलला आहे असं वाटतं नाही, कारण वधू कडून ती नोकरी करणारी हवीच, पण ती 'गृहकृत्यदक्ष' असावीच.हा आग्रह असतो.

त्यात अगदी लहानपणापासून स्त्रीला मातृत्व म्हणजे स्त्री जीवनाची इतिकर्तव्यता असे ऐकवण्यात आलेले असते. आईपण आणि निसर्ग यांचा जवळचा संबंध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिघात जाणिवपूर्वक बांधला जातो. याद्वारे तिचं दमन होते, तिला दुय्यम स्थान मिळते.

ही पुरुषसत्ताक पद्धतीची जाणिवपूर्वक केलेली चतुराई आहे. मग यात वर सांगितल्याप्रमाणे मुलं संगोपन ही फक्त स्त्रीचीच जबाबदारी असे गृहीत धरले जाते. मुलींनी करिअर करणं आणि मातृत्वाची जबाबदारी घेणं ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधणे अशक्य नाही, पण यात स्त्रीची जास्त ओढाताण होते.

यात घरातील पुरुषांनी तिच्या बरोबरीने संततीसंगोपनात सहभाग घ्यायला हवा. घरातील ज्येष्ठांनी आम्हाला वंशाचा दिवा हवा हा अट्टाहास सोडून येईल त्या अपत्याचे स्वागत करुन तिला मदत केली पाहिजे. वेळेचे, कामाचे नियोजन योग्य रितीने केल्यास हे अवघड नाही.

मुलींनाही स्वप्नं पहायचा अधिकार आहे, तिच्या बुध्दीला योग्य खाद्य मिळेल, बुध्दीचा उपयोग होईल, असं करिअर करायचा अधिकार आहे, हे समाजाने लक्षात घ्यायला हवे. या टॉपर मुलींच्या आयुष्याचे पोतेरे होऊ नये, यासाठी समाजातील पुरषी मानसिकतेत सुधारणा व्हायला हवी.

आईपण महान आहेच पण यापेक्षा तिला माणूस म्हणून जगू देणं, तिच्या स्वप्नपूर्तीसाठी समाज घडवणं हे आपल्या हातात आहेच. ते तर आपण निश्चितच करू शकतो ना..!

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
संपादक, सखी संपदा.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !