उद्याच्या जगण्यासाठी आज वृक्षारोपण करणे महत्त्वाचे : एसपी राकेश ओला

'स्नेहबंध'तर्फे पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण


अहमदनगर - सर्वत्र पर्यावरणाची हानी होणे सुरु आहे. त्यामुळे तापमान वाढतच आहे. मानवाला उद्याच्या जगण्यासाठी आज वृक्षारोपण करणे महत्त्वाचे झाले आहे. वृक्ष असतील तरच मानवजाती वाचणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बनवून ठेवा असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केले.

स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात मंगळवारी पोलिस अधीक्षक ओला यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी 'स्नेहबंध'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, हे उपस्थित होते.

तसेच पोलिस उपअधीक्षक (गृह) हरीश खेडकर, उपअधीक्षक अमोल भारती, राखीव पोलिस निरीक्षक अनुजकुमार मडामे, पोलिस निरीक्षक योगेश राजगुरू, सहायक फौजदार मुसा, सहायक फौजदार अन्वर सय्यद आदी उपस्थित होते.

यावेळी पोलिस अधीक्षक ओला म्हणाले, दिवसेंदिवस दुष्काळाची वाढती तीव्रता, पाणी टंचाईची स्थिती तसेच पावसाचे अनियमित आगमन यामुळे पर्यावरण संतुलन बिघडू लागले आहे. परिपूर्ण वाढलेली दोन झाडे चारजणांच्या कुटुंबासाठी पुरेसा ठरेल, एवढा ऑक्सिजन निर्माण करतात.

वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळेच वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. रोपण केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडण्यासाठी जनजागृती गरज निर्माण झाली आहे. याप्रसंगी विविध प्रजातींच्या वृक्षारोपण करण्यात आले.

नागरिकांनी वृक्षारोपणासाठी पुढे येण्याची गरज : आज दिवसेंदिवस प्रदुषणाचे प्रमाण वाढत आहे. पाण्याअभावी सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वत्र वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. नागरिकांनी वृक्षारोपणासाठी पुढे येण्याची गरज आहे.

वृक्ष लागवडीसह त्यांचे जतन करणेही आवश्यक आहे. प्रत्येकाने कर्तव्य भावनेतून किमान एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करा, असे आवाहन  'स्नेहबंध'चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले. या कार्यक्रमात सर्वांच्या हस्ते एसपी कार्यालय परिसरात एकेक झाड लावण्यात आले.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !