पुणे. जगाच्या नकाशावर लक्ष वेधून घेणारे एक सतत कार्यरत असलेले महत्वाचे शहर एक ऐतिहासिक, सांस्कृतीक, शैक्षणिक अन् आधुनिकतेची कास धरणारे महानगर..
आमच्या अहमदनगर शहरापासून केवळ १०० किलोमीटर अंतरावर म्हणजे अगदी शेजारी असलेल्या या शहरात आमची उद्याची पिढी नोकरीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात येथे वसली आहे. हे शहर दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
येथील पिंपरी चिंचवड उपनगराने आशिया खंडातील सर्वात मोठी विकसीत एमआयडीसी अशी ख्याती मिळवली असून पुण्यातील आयटी उद्योगाने देशातील तरुणाईचे लक्ष वेधले असून नोकरीसाठी या शहराचे दार ही तरुणाई ठोठावत असते.
आम्ही नगरकर नशीबवान आहोत ते एका गोष्टीसाठी की पुणे आमच्या शेजारी असलेले जगातील एक महत्वाचे शहर आहे. खरंच, कोणत्याही शहराने आपली संस्कृती टिकवून ठेवताना तेथील औद्योगीक विकास करण्याकडे लक्ष दिलें तर ते शहर खऱ्या अर्थाने समृध्द होत असते.
या शहराने हेच जपलं, म्हणूनच येथे शहराभोवती असलेली अनेक उपनगरे विकसीत होत गेली. अन् राज्यकर्त्यांनी तेथील विकासाकडे जाणीवपूर्वक प्रयत्न केले. काल काही कौटुंबिक कामासाठी पुण्यात असताना प्रकर्षाने वाटुन गेलं की आमचं ही शहर एक दिवस असंच विकसित व्हावं. रस्ते मजबूत व्हावे.
आपल्या शहराचा औद्योगीक विकास व्हावा जेणेकरून आमची उद्याची पिढी पोटापाण्यासाठी इतर शहरात परागंदा तरी होणारं नाहीत. आमचं शहर मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. एकेकाळी निजामशहाच्या राजधानीचे समृध्द हे शहर होते. पाचशे वर्षांचा समृध्द वारसा शहराला लाभलेला आहे.
इथल्या धार्मिक अन् ऐतिहासिक वास्तू आपल्या समृद्धीची साक्ष देत आजही उभ्या आहेत. खरेतर देशातील महत्वाच्या शहरांमधे धार्मिक अन् ऐतिहासिक पर्यटन शहर म्हणून अहमदनगर गणले जावे.
या निमित्ताने या शहरांची भरभराट व्हावी पण तसेही नाही. कारण त्या दृष्टीने या शहराचा विकास झाला नाही. निदान औद्योगिक विकास व्हावा, चार दोन मोठे कारखाने येथे आले तर आमच्या शहराचा विकास तरी होईल. या निमित्ताने इतर राज्यातील नागरिक येथे स्थायिक होतील.
पुण्यातील उपनगरातील कोणत्याही अपार्टमेंटमध्ये नजर टाकली तर एक लक्षात येते. तेथे पुणेकरांबरोबरच इतर शहरातील,राज्यातील कुटुंबे मोठ्या संख्येने स्थायिक झाली आहेत.
अपार्टमेंटमधे राहणाऱ्या लोकांच्या नावांकडे नजर टाकली तर तेथे शेट्टी, सुब्रमण्यम, अय्यर, रेड्डी, राव, कपूर ही नावे दिसतात. याचं कारण तेथील औद्योगिक विकास. त्यामुळे तेथील निवासी अपार्टमेंट देखील अतिशय दर्जेदार, सुविधा अन् गुणवत्ता पुर्ण असलेली पहायला मिळतात.
नाहीतर आमच्या अहमदनगर शहरात कुटुंब मोठं झाल्यामुळे, घर लहान वाटत असल्यामुळे नाईलाजाने मग घरातला एखादा सदस्य आपल्या बायको, मुलांसह शहरांत फ्लॅट घेतो व रहातो. पुण्यात नातेवाईकांकडे गेलो असता सहज तेथे राहणाऱ्या लोकांची लिस्ट वाचायचा योग आला. अन् वाटून गेलं...!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)