मला अजिबात खोटं सहन होत नाही, मी तोंडावर लोकांना बोलतो, त्यांच्या चुका काढतो. मला स्पष्ट बोलायची सवय आहे. असं आपल्या फटकळपणाचे उदात्तीकरण करणारी किती तरी माणसं आपल्या अवतीभवती असतात. पण फटकळपणा आणि स्पष्टवक्तेपणा यात अंतर आहे.
फटकळपणा हा उर्मटपणाकडे जात असतो. ह्याचा स्वर मन दुखावणारा असतो.. समोरचा माणूस आपल्यापासून दूर गेला तरी चालेल, अशी या फटकळ माणसांची धारणा असते.. गेला उडत हा आविर्भाव असतो.
उठसूट लोकांना शहाणपण शिकवणं, अपमान करणं तोडून बोलणं हा फटकळपणा. यामुळे लोक यांच्यापासून दूर जातात. स्पष्ट बोलणं हे प्रांजळ असतं, समोरच्याला समजून सांगण्याचा प्रयत्न असतो. नेमक्या गोष्टीवरच बोट ठेवून ही माणसं बोलतात.
उगाच फाफटपसारा नाही. ताकाला जाऊन भांडे लपवायचे ही भानगड नाही. 'सिधी बात.. नो बकवास'. हे खरं बोलणं समजंस व्यक्तीला पटकन समजतं. त्यातला प्रांजळपणा मनापर्यंत पोहचतो.
कारण ही स्पष्टवक्ती माणसं एरवी फार प्रेमळ, मायाळू असतात. तुमच्या आयुष्यात अशी फणसासारखी, नारळासारखी टणक वाटणारी पण अंतरंगात गोड गरे, मधुर पाणी घेऊन वावरणारी माणसं असतील तर जपा त्यांना.
कारण ही माणसं आपल्या व्यक्तीमत्त्वाला पैलू पाडण्याचे काम करत असतात. याने आपलं व्यक्तिमत्त्व झळाळून उठते. बघा पटतय का..!
- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)