आयुष्याचं रुदन संगीत असो वा हर्षगीत, ऐकणारे कान हवेत


आज २१ जून, जागतिक संगीत दिन. मला लहान असताना गाणं शिकवायला जोशी गुरुजी येत असत. त्यांनी एक गोष्ट सांगितलेली मला पक्की ध्यानात बसलीय. संगीत आणि गीत याच्या अभ्यासापूर्वी आपला कान चांगला तयार व्हायला हवा.

कान तयार व्हायला हवा म्हणजे काय.? तर आपल्याला आपण श्रवण केलेले काय आहे, त्यातून नीरक्षीर वेगळं काढता आलं पाहिजे. संगीताचा, गीतांचा जन्म खूप पुरातन असावा. आईने आपल्या तान्हुल्यासाठी गायलेलं गाणं हे पहिलं गीत आणि त्या गीताच्या तालावर हळुवार थोपटणं म्हणजे संगीत.

संगीतातील राग मोगल दरबारी गायिले जात असत. तानसेन म्हणे मेघमल्हार गाऊन पाऊस पाडत. दिपराग गाऊन दिवे लावत. संगीतात शक्ती आहे हे संशोधनामुळे सिध्द झालं आहे. संगीतामुळे फक्त मन शांत होत नाही, तर आपल्या शरिरावरही प्रभाव पडत असतो.

संगीतामुळे आपल्या मेंदूतील सर्व क्षेत्रातील संवेदना एकावेळी जाग्या होतात. दुसऱ्या महायुध्दातील जखमींना उपचार करताना संगीतथेरपीचा वापर केला जात होता. संगीत आणि गीत आपल्या देशात अनेक संगितकारांनी जिवंत ठेवले आहे.

चित्रपटसृष्टीने अनेक अजरामर गीते आपल्याला दिली आहेत. आर. डी. बर्मनदांनी आरोह आणि अवरोहाच्या चौकटीतून संगिताला मुक्त करुन आपली एक वेगळीच शैली तयार केली. त्यांची उडत्या चालीची गाणी त्यावेळी अतिशय लोकप्रिय झाली.

गीतसंगीत आपल्या आयुष्यात अविभाज्य भाग आहे. संगिताचे शिलेदार म्हणजे पखवाज, तबला, हार्मोनियम, ढोलकी, एकतारी, व्हायोलिन, सनई, तुतारी, डफ, तुणतुण, सतार, बांसुरी, हे आणि आणखीन कितीतरी.!

तसंच गीताचे असंख्य प्रकार आहेत, अंगाई, भजन, भूपाळी, नांदी, भावगीत, भक्तीगीत, विरहगीत, प्रेमगीत, आणखीन बरेच काही.. सकाळी उठल्याबरोबर रेडिओ लावल्याशिवाय माझा तरी दिवस सुरु होत नाही. त्या गाण्यात रमत सारी कामं कशी पटपट उरकतात.

संगीत आपल्याला आनंद देणारे, एकांत, एकटेपणा सुखद करणारे आहे. आपल्या आयुष्याचं रुदन संगीत असो वा हर्षगीत प्रत्येकालाच ते ऐकणारे कान मिळायला हवेत आणि भैरवी सुखद व्हायला हवी.

- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !