..तेंव्हा खुशाल समजावं की आता 'ऋतु गाभुळतोय'


झोपता झोपता दुरदर्शन बातमी देतं.. मान्सून एक जुनपर्यंत केरळमध्ये दाखल होणार. मार्च, एप्रिल महिन्यात २४ तास एसी, कुलर, पंख्याला आचवलेलं शरीर.. पहाटे पहाटे पायाशी असलेली पातळ चादर, बेडशीट, साखरझोपेत कधीतरी अंगावर ओढून घेत... समजावं, तेंव्हा ऋतु गाभुळतोय. 


ऐटीत झाडावरुन मोहीत करणारे बहावा, पलाश, गुलमोहर.. वार्‍याचा खोडसाळपणाने पायाशी पायघड्या पसरवू लागतात. झाडावरचं कैऱ्यांचं गोकुळ रिकामं होउन गेलेलं असतं, एखादा झाडावरच पिकलेला आंबा, खाली पडून केशर कोय सांडतो. जांभुळ, करवंदाचा काळा, जांभळा रंग जमिनी रंगवू लागतो... तेंव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

आठवतेय आई आजीची लोणच्या, साखरंब्याची घाई.? कोठीत धान्यं भरुन जागेवर ठेवायची लगबग, गच्ची, गॅलरीत निवांत पहुडलेली चीजवस्तू, आडोश्याच्या जागी हलवायची बाबा आजोबांची गडबड..? तेव्हा समजावं की आता ऋतु गाभुळतोय.

ताटातला आमरस सर्रासपणे गोडच लागतो. साखरची गोडी त्याला आता नकोशी होते. उरलेल्या पापड कुरडया आता हवाबंद डब्यात जावून बसतात, डाळपन्हं, आईस्क्रीम, सरबतं, सवयीची होत जातात. माठातल्या पाण्यात एखादी भर आताशी कमीच पडते. तेंव्हा खुशाल समजावं.... की ऋतु गाभुळतोय.

दुर्वास ऋषीच्या अविर्भावात आग ओकणारा रवी.. काळ्या पांढऱ्या ढगांशी सलगी करु पाहतो, मेघनभात अडकलेली किरणं सोडवता सोडवता.. असाच दमुन जातो. भास्कराचा धाक कमी झाल्याचं पाहुन वाराही उधळतो. गच्ची, दोरीवरच्या कपडे, गाद्यांवर आता लक्ष ठेवावं लागतं.. तेंव्हा खुशाल समजावं.. ऋतु गाभुळतोय.

निरभ्र वाटणारं आकाश क्षणात ढगांनी गच्च असं आभाळ होवून जातं, ऊन-सावलीच्या खेळात चराचर सावळं होतं, वीज, गडगडाटानं.. रसपोळीनं सुस्तावलेली दुपार.. धावपळीची होते. झाडांवरच्या पक्षांची किलबिल.. किलबिल न राहता नव्या स्थलांतराची भाषा बोलू लागते..

उफाळत्या जमीनीत नांगर फिरु लागतात. मोगऱ्याचे ताटवे विरळ होवू लागतात, मृदगंधाचे वास श्वासात विसावून जातात.. खुशाल समजावं की तेंव्हा.. ऋतु गाभुळतोय..

उंबऱ्यावर आलेल्या त्या वर्षेला भेटण्यासाठी देहमनाने आपणही आतुरतो. तेंव्हा अगदी खुशाल समजावं.. की ऋतु गाभुळतोय..!

- मानसी पाटील (पुणे)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !